सागर पाटील : सकाळ न्यूज नेटवर्क
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपच्या बाजूने कौल लागण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपचे सरकार सत्तेत आले तर मुख्यमंत्री कोण? या चर्चेला उधाण आले आहे. या स्पर्धेत तूर्तास जी नावे आघाडीवर आहेत, त्यात दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता, खा. मनोज तिवारी, प्रवेश वर्मा आणि रमेश बिधुडी यांची नावे आघाडीवर दिसत आहेत.
दिल्लीमध्ये २८ वर्षांपासून भाजप सत्तेतून बाहेर आहे. अडीच दशकानंतर पहिल्यांदा सत्तेचा दुष्काळ संपण्याची चिन्हे असल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. भाजपच्या शेवटच्या मुख्यमंत्री सुषमा स्वराज यांना अवघ्या ५२ दिवसांचा कार्यकाळ मिळाला होता. निवडणुकीचा निकाल अद्याप जाहीर व्हायचा असला तरी भाजपकडून मुख्यमंत्री कोण? याच्या चर्चा मात्र झडत आहेत. फारशा वाद-विवादात नसणारे प्रदेश भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागू शकते, अशी चर्चा आहे.
विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता हेही डार्क हॉर्स ठरू शकतात. रोहिणी मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात असलेल्या गुप्ता यांची लढत यावेळी ‘आप’चे प्रदीप मित्तल आणि काँग्रेसच्या सुमेश गुप्ता यांच्याशी होत आहे. पूर्वांचल समाजाचा मोठा चेहरा असलेल्या खा. मनोज तिवारी यांना संधी दिली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
बिधुडी, वर्मांवरही विचार होण्याची शक्यता
भाजपचे नेते आणि उमेदवार प्रवेश वर्मा आणि रमेश बिधुडी हे दोघेही माजी खासदार आहेत. वादग्रस्त विधानांसाठी हे नेते प्रसिद्ध आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी या नेत्यांना तिकीट देण्यास पक्षाने नकार दिला होता. मात्र मुख्यमंत्री पदासाठी आक्रमक चेहरा देण्याचा विचार पक्षाने केल्यास, वरीलपैकी एका नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते, असे मानले जात आहे.