दारू पाजून प्रियकराच्या मदतीने पतीचा दगडाने ठेचून खून; मृतदेह कृष्णा नदीत दिला फेकून, पत्नीसह प्रियकराला अटक
esakal February 08, 2025 05:45 PM

अनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्याच्या उद्देशाने सिद्धवा हिने पती आप्पासाहेब याला बुधवारी रात्री रायबाग तालुक्यातील बुवाची सौंदत्ती येथे कृष्णाकाठावर आणले.

मांजरी : अनैतिक संबंधाला अडचण ठरण्याच्या कारणावरून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून (Husband's Murder) करून मृतदेह कृष्णा नदीपात्रात (Krishna River) फेकून दिल्याची घटना गुरुवारी सकाळी रायबाग तालुक्यातील बुवाची सौंदत्ती येथे घडली. आप्पासाब ऊर्फ मच्छिंद्र तुकाराम ओलेकर (वय ४०, मूळ अलगीनाळ, ता. तिकोटा, सध्या बस्तवाड, ता. रायबाग) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

गणपती परसप्पा कांबळे व सिद्धव्वा आप्पासाहेब ओलेकर अशी खुनातील संशयितांची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी, मृत व्यक्तीची बहीण महानंदा तोरणवर यांनी रायबाग स्थानकात (Raibag Police) दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, भाऊ आप्पासाहेब ओलेकर याची पत्नी सिद्धवा हिचे बसवाड येथील गणपती याच्याबरोबर अनैतिक संबंध होते.

तिला वारंवार ‘संबंध सोडून दे, सुखाचा संसार कर’ असे वारंवार सांगूनही न जुमानता सिद्धवा हिने प्रियकर गणपती याच्याबरोबर संबंध ठेवले होते. अनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्याच्या उद्देशाने सिद्धवा हिने पती आप्पासाहेब याला बुधवारी रात्री रायबाग तालुक्यातील बुवाची सौंदत्ती येथे कृष्णाकाठावर आणले.

त्याला दारू पाजून प्रियकराच्या मदतीने त्याचे डोके दगडाने ठेचून खून करून मृतदेह कृष्णानदीत फेकून दिला. या प्रकरणाचा रायबाग पोलिसांनी छडा लावला. वरील दोघांनाही अटक करून न्यायालयासमोर हजर केले असून, पुढील तपास सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.