मुंबईमध्ये मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर देशभाल- दुरुस्ती आणि इतर तांत्रिक कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी मेगाब्लॉकच्या वेळा आणि रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबारेह पडावे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत जंबोब्लॉक घेण्यात येत आहे. गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर रविवारी सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.58 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने धावतील. ठाण्यापुढे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. सकाळी 11.25 ते दुपारी 3.27 वाजेपर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील, मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा धावतील.
हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 पर्यंत अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाउन सेवा बंद ठेवनण्यात येणार आहेत. सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 वाजेपर्यंत गोरेगाव/वांद्रे येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या वांद्रे येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत. ब्लॉक कालावधीमध्ये पनवेल – कुर्ला – पनवेल या दरम्यान विशेष सेवा ट्रेन चालवल्या जातील. हार्बर लाईनच्या प्रवाशांना सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत मध्ये रेल्वे आणि पश्चिम रेल्वे माग्राने प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत ग्रँण्ट रोड ते मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर जंबोब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट – मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. चर्चगेटला येणाऱ्या काही अप लोकल वांद्रे / दादरपर्यंत चालवण्यात येणार आहेत. या जंबो ब्लॉकमुळे रविवारी पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही.