हिंगोली : जिल्ह्यातील चार लाडक्या भावांनी ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ घेतला असून आतापर्यंत सहा हप्ते उचलले आहेत. कारवाईच्या भीतीने त्यांनी दिलेल्या अर्जावरून हा उलगडा झाला. शासनाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने सांगितले आहे.
हिंगोली जिल्ह्यातून सुमारे साडेतीन लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल केले होते. पंचायत समितीस्तरावरून सदर अर्ज मंजूर केल्यानंतर महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यानंतर शासनाने काही दिवसांपूर्वी बोगस लाभार्थींनी योजनेचा लाभ बंद करण्याबाबत अर्ज देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातून आठ जणांनी लाभ बंद करण्याचा अर्ज दिला आहे. यामध्ये चार पुरुषांचा समावेश आहे.
या संदर्भात महिला व बालविकास अधिकारी राजेश मगर यांनी सांगितले, योजनाचा लाभ बंद करण्यासंदर्भात आठ अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील चार पुरुषांची नावे असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असून नेमकी नावात चूक झाली का? याची तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये सत्यता आढळून आल्यास शासनाच्या निर्देशानुसार कारवाई केली जाणार असल्याचेही मगर यांनी सांगितले.