अभिजीत देशमुख, साम टीव्ही
जेवण सांडण्याच्या किरकोळ कारणावरून मजूरांमध्ये वाद झाला. यात एका मजूराची हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिम येथील दीनदयाल रोड परिसरात एका बांधकाम साईटवर घडली आहे. या घटनेनंतर आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे डोंबिवली शहरात एकच खळबळ उडाली आहे.
येथील दीनदयाल रोड परिसरात एका बांधकाम साईटवर मजूरांमध्ये वाद झाला होता. गुरूवारी रात्रीच्या सुमारास मजूरांनी जेवण बनवले होते. नंतर जयसान मांझी या मजुराने जेवण सांडले. जेवण सांडल्यावरून मजूर आणि त्याच्या सहकाऱ्यामध्ये बाचाबाची झाली. जयसान याला राग अनावर झाला.
सगळे मजूर झोपले होते. मात्र, वादामुळे जयसान संतापला. रागाच्या भरात त्यानं झोपलेल्या गौरव जगत या मजूराच्या डोक्यावर बांबूने वार केले. बांबूने वार केल्यामुळे गौरवला गंभीर दुखापत झाली होती. वार इतका जोरदार होता की, यात मजूराचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दोघेही मजूर मुळचे ओडीसा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच विष्णू नगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. तसेच आरोपी जयसान मांझी याला अटक केली. विष्णू नगर पोलिसांनी या प्रकरणी जयसान मांझी विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.