- हारुन शेख, shaikh.harun@gmail.com
दखनीचा जन्म महाराष्ट्रातला असल्यामुळे मराठीचा सर्वांत जास्त प्रभाव तिच्यावर पडला मागील लेखात आपण बोललो. दखनीतला एखादा संवाद तुम्ही लक्ष देऊन ऐकलात तर अर्धे शब्द मराठी सापडतील. याशिवाय वाक्प्रचार, म्हणी, उच्चारणे, लकबी, लोकसंकेत, चालीरीती यांतही मराठी आणि दखनीचा घनिष्ट संबंध आला आहे. कसा तो पाहू.
‘मान का पान देना’ ही दखनीतली म्हण मराठीतल्या ‘मानाचे पान’ या वाक्प्रचारातून आली आहे. ती चाल आणि लोकसंकेतही दखनीने उचलला आहे. ‘बाँट में पडना’ म्हणजे मराठीत ‘वाटेत पडलेले असणे’- म्हणजे सहज उपलब्ध असणे. ‘काम के लोकां क्या बाँट मे पडे हैं?’ असं त्या अर्थाचे दखनीतलं वाक्य. ‘निगरघट’ हा दखनीतला शब्द मराठी ‘निगरगट्ट’सारखा. ‘यता क्यु तेरा दिल निगरघट हुआ?’ असं दखनीतलं त्या शब्दाचा वापर असलेलं वाक्य. दैनंदिन जीवनाशी संबंधित ‘इधर बाव उधर कुँवा’ (इकडे आड तिकडे विहीर), ‘कान भरना’ (कान भरणे), ‘गरब गलना ’(गर्भगळीत होणे), ‘नाव छोडना’ (नाव टाकणे/ संबंध तोडणे), ‘साटे बुदऱ्हाटे (साठी- बुद्धी नाठी) या म्हणी आणि वाक्प्रचार आढळतात. ही अगदी कणभर म्हणता येतील एवढीच उदाहरणं आहेत. दखनी आणि मराठी भाषेचा अनुबंध दखनीच्या जन्मापासून असाच मोठी देवघेव असलेला राहिलाय.
दखनी आणि मराठीत ‘च’ या अव्ययाचा जो वापर केला जातो, तो एकमेव आधार पुरेसा ठरावा. आधुनिक भारतीय भाषांत मराठीखेरीज दुसऱ्या कोणत्याही भाषेत या अव्ययाचा प्रयोग होत नाही. त्यामुळे दखनी भाषेतील ‘च’ मराठीतूनच उसनवारीने आलेला आहे याविषयी ठामपणे सांगता येतं.
‘मैं क्या पाप करी बोलके ऐसा शोहर मिल्या’ या वाक्यात ‘बोलके’ हा एक विशेष लकबीचा शब्द येतो. त्याचा अर्थ ‘म्हणून’. त्यामुळे या वाक्याचा अर्थ- ‘मी असं काय पाप केलं म्हणून मला असा नवरा मिळाला.’ ‘पापाँ भोत बोलकेच पानी नइ पडता’ या वाक्याचा अर्थ ‘पापं वाढली म्हणून पाऊस पडेना!’ लकबीचा विचार करता ‘कते’ हा आणखी एक शब्द बोलीभाषेत वारंवार आढळतो. ‘कहते’ याचा संक्षेप ‘कते’ असा झाला आहे. ‘उन्ने तालेवार हैं कते’ याचा अर्थ ‘ते खूप तालेवार आहेत म्हणे’. ‘उनो आते कते’ म्हणजे ‘ते येणार आहेत म्हणे’. ‘बी’ हे ग्रामीण मराठीतलं अव्ययही दखनीत ओघानं येतं. जसं ‘कायबी न्हाई’चं ‘क्याबी नै’.
सुफी संतांचा जेव्हा दख्खनेत मोठा राबता होता, त्या वेळी त्यांनी दखनी हीच भाषा संवादाचं साधन म्हणून निवडली आणि त्याच भाषेत साहित्यनिर्मिती केली. भारतातल्या काही आध्यात्मिक कल्पनाही उचलल्या आणि या आदानप्रदानातून सुफी पंथाला नवे आयाम मिळाले. वेदांतील तत्त्वज्ञान आणि सुफींचं अध्यात्म यांचा सुरेख मिलाप सुफींच्या साहित्यनिर्मितीत आढळतो. वेदांतील ‘अहं ब्रह्मास्मि।’ हे महावाक्य किंवा ज्ञानेश्वरांनी ‘जीव आणि शिव एकची’ असं जे म्हटलं आहे, ते सुफींच्या ‘अनल हक’च्या (मी सत्य आहे) संकल्पनेशी साधर्म्य सांगतं. १४०२ मध्ये गुलबर्ग्यात आलेले सुफी संत ख्वाजा बंदेनवाज हे दखनी भाषेत लिहीत असत.
‘बंदेनवाज’ (भक्तवत्सल) व ‘गेसूदराज’ (केस गुडघ्यापर्यंत लांब असल्यामुळे- लांब केस असलेले) या पदव्या त्यांना मिळाल्या होत्या. हे दखनी भाषेत लिहिणारे आद्य लेखक म्हणता येतील. त्यांचा दर्गा गुलबर्गा इथे आजही आहे. ‘मीराजूल आशिकैन’ (भक्तांची साधना) या ग्रंथात त्यांनी ईश्वरप्राप्तीचा मार्ग चर्चिला आहे. मराठीसारखाच त्यांच्या लिखाणात ‘ने’ या विभक्तीच्या तृतीया प्रत्ययाचा सढळ वापर आहे. ‘शिकारनामा’ या वेदान्तपर गद्यपुस्तिकेत त्यांनी ‘काट्याच्या अणिवर वसली तीन गावें।’ या कूटाचा वापर केलेला आहे.
शहा अश्रफ बियाबानी यांनी लिहिलेल्या ‘नौसरहार’ नावाच्या ग्रंथात त्यांनी आपल्या भाषेला- जी दखनीच आहे, तिला ‘हिंदुइ’ असं म्हटलंय. इब्राहिम आदिलशाह त्याच्या फर्मानांची सुरुवात ‘अज पूजा सिरी सरसती’ अशी करत असे. याचा अर्थ- ‘हा इब्राहिम आदिलशाह श्री सरस्वतीची पूजा करून हे फर्मान बजावत आहे.’ त्यानं स्वतः ‘किताबे नौरस’ हा दखनी भाषेतला ग्रंथ रचला होता. इब्राहिम आदिलशाहचं चरित्र लिहिणारा त्याच्या दरबारातील अब्दुल्ला नावाचा कवी ‘मी दिल्लीचा राहणारा असलो तरी माझी भाषा हिंदुइ आहे. मला अरबी व फार्सी येत नाही,’ असं म्हणतो.
दखनीत मराठी शब्द तर आहेतच, शिवाय अनेक फार्सी आणि अरबी शब्दही मराठीचं रुपडं लेऊन दखनीत आले आहेत. उदाहरणार्थ ‘मज्जित/ मज्जिद’ हा मशिदीसाठी वापरला जाणारा प्राचीन मराठी शब्द ‘मिजिगिति’ या शब्दापासून आला आहे. ठाणे जिल्ह्यात कोपराड गावी रामदेवराव यादवाचा सरदार कान्हरदेव याच्या संमतीनं मुहुमद प्रोस्त्राहि या मुसलमान व्यापाऱ्याने उभारलेल्या मशिदीविषयीच्या शिलालेखात ‘मिजिगिति’ हा शब्द वापरलाय. ‘श्री मिजिगिति प्रतिबधु केला’ म्हणजे दोन गावांतील कराचं उत्पन्न या मशिदीसाठी राखून ठेवलं, असा उल्लेख आहे. हा शिलालेख शके १२१९ म्हणजे इसवीसन १२९७ चा आहे. मिजिगिति हा शब्द मशीद या फार्सी शब्दाचं प्राकृत रूपांतर. इतरही शिलालेखात हा शब्द सापडतो.
ज्ञानेश्वरीतल्या नवव्या अध्यायातली १७३ वी ओवी पहा-
अथवा कोल्हैरिचे असिवार।
नातरीं वोडंबरीचे अळंकार।
कीं गंधर्वनगरीचे आवार।
आभासती कां॥
मातीचे घोडेस्वार (कोल्हैरिचे असिवार) किंवा गारुडी विद्येनं केलेले दागिने (वोडंबरीचे अळंकार) किंवा आकाशात ढगांच्या प्रतिकृतीनं तयार झालेलं गाव (गंधर्वनगरीचे आवार) या मूळ वस्तूंच्या प्रतिकृती वाटत असल्या, तरी शेवटी आभासमानच असतात. आता यात आलेला ‘असिवार’ हा शब्द ‘सवार’ (घोड्यावर बसलेला शिपाई) या अरबी शब्दाचं अनेकवचन आहे. ‘स्वार’ हा शब्द दखनीत आणि मराठीतही असा वळसा घेऊन आला आहे.
माय मऱ्हाटीचं छत्र मोठं मायाळू आहे. त्या छत्राखाली जन्माला आलेली आणि समृद्ध झालेली दखनी ही भाषा मराठीची अतिशय गोड बोलीभाषा आहे. ती नुसती ऐकणंही मनाला प्रसन्नता आणतं. दोन लेखांत तिचं सौंदर्य जेवढं मला सांगता आलं तेवढा मी प्रयत्न केला! या बोलीतलं जुनं साहित्य वेगळ्या लिपीत (उर्दू/ फार्सी) अडकल्यामुळे ती पुरेशी अभ्यासली गेली नाही. पण तिचा आणखी अभ्यास होणं गरजेचं आहे. मराठीच्या समृद्धीत ते भर घालणारंच ठरेल.