रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मुंबईने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या डावात मुंबईचे आघाडीचे फलंदाज फेल गेले. पण मधल्या फळीत असलेल्या शम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांनी डाव सावरला. आठव्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली आणि मुंबईला 315 धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. मुंबईने दिलेलं 315 धावांचं आव्हान गाठताना हरियाणाने चांगली सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी झाली. ही जोडी फोडण्यात शार्दुल ठाकुरला यश आलं. त्यानंतर हरियाणाला एका पाठोपाठ एक असे धक्के देण्यास सुरुवात केली. शार्दुल ठाकुरने 18.5 षटकात फक्त 58 धावा देऊन 6 विकेट घेतल्या. शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीचा सामना करताना हरियाणाला अडचणीचं गेलं. 82 चेंडूवर तर त्याने एकही धाव दिली नाही.
शार्दुल ठाकुरने सर्वात आधी लक्ष्य दलालला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर रोहित प्रमोद शर्माची विकेट घेतली. त्यानंतर तळाच्या फलंदाजांना एक एक करून तंबूचा रस्ता दाखवत गेला. अनुत ठकराल, जयंत यादव, अंशुल कंबोज आणि अजित चहल यांना आपलं शिकार केलं. मुंबईचा संघ खरं तर पहिल्या डावात अडचणीत आला होता. पण शार्दुल ठाकुरच्या खेळीमुळे मुंबईला पहिल्या डावात 14 धावांची आघाडी घेता आली. शार्दुल ठाकुरने रणजी स्पर्धेत कमाल केली आहे. आतापर्यंत त्याने 32 विकेट घेतल्या. या पर्वात पहिल्या पाच विकेट घेण्याचा कारनामाही केला. इतकंच काय तर फलंदाजीतही त्याने चमक दाखवली. 44 च्या सरासरीने 396 धावा केल्या. यात तीन अर्धशतकं आणि एक शतक ठोकलं आहे.
शार्दुल ठाकुर सध्या चांगल्या फॉर्मात आहे. पण आयपीएल मेगा लिलावात त्याला संघात घेण्यासाठी कोणीच रूची दाखवली नाही. तसेच शार्दुल ठाकुर सध्या टीम इंडियातही नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कसोटी संघात त्याची निवड झाली नाही. पण त्याची सध्याची कामगिरी पाहता त्याला संघात लवकरच स्थान मिळू शकते. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेसाठी शार्दुल ठाकुरचा विचार केला जाऊ शकतो.