तुर्भे, ता. १० (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेत विविध विभागांमध्ये कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेल्या आठ हजार ५०० कामगारांनी सोमवारपासून (ता. १०) कामबंद आंदोलन पुकारले. समाज समता कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली ‘समान काम, समान वेतन’ या मागणीसाठी हे आंदोलन सुरू असून, यापूर्वीही प्रशासनाला याबाबत इशारा देण्यात आला होता, मात्र प्रशासनाने समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने संप पुकारण्यात आल्याचे कामगारांकडून सांगण्यात आले.
सोमवारी सकाळपासून आंदोलनाला सुरुवात झाल्याने स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, बागायती, बांधकाम आणि अन्य महत्त्वाच्या विभागांचे कामकाज पूर्णतः ठप्प झाले होते. त्यामुळे नवी मुंबईकरांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. आमच्या न्यायासाठी काम बंद केले आहे, यात नवी मुंबईतील नागरिकांना वेठीस धरण्याचा आमचा हेतू नसल्याचे, या वेळी कामगार संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
कामगारांच्या संपामुळे शहरातील कचरावेचक आणि साफसफाईच्या कामांवर परिणाम होत असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने यावर तोडगा काढावा, अशी मागणी शहरवासीयांकडून करण्यात येत आहे. सोमवारी सकाळपासून शहरातील कचरा उचलला न गेल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत, तर काही ठिकाणी रस्त्यालगतचे लिटल बीन्स तुडुंब भरल्याने कचरा रस्त्यावर पसरला आहे. कचऱ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून रोगराई बळावण्याचा धोका वाढला आहे.
नवी मुंबई पालिका प्रशासनाने बोलणी करण्यासाठी समाज समता कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शनिवारी सकाळी ११ वाजताची वेळ दिली होती, परंतु त्यानंतर प्रशासनाकडून याबाबत ठोस माहिती देण्यात आली नाही. सर्व कामगार संपात सहभागी झाले असून, तुर्भे डम्पिंग ग्राउंडबरोबरच विविध भागात आंदोलन सुरू आहे.
- मंगेश लाड, प्रमुख, समता समाज कामगार संघटना
शहरातील विविध भागात कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. नवी मुंबई महापालिकेने मात्र रात्रपाळीतील सफाई कामगारांकडून रात्रीचा कचरा उचलला असून, सकाळपासून नाका कामगारांकडून साफसफाई व कचरा संकलन सुरू केले आहे.
- डॉ. अजय गडदे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, नवी मुंबई
समाजमाध्यमांद्वारे नागरिकांना आवाहन
कोपरखैरणे सेक्टर १४ येथील निसर्ग उद्यानाबाहेर सफाई कामगार व घंटागाडी कामगारांनी आंदोलन करत प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. कोपरखैरणे येथील कामगारांना भेट देत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आपला जाहीर पाठिंबा दिला. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या संपाला सहकार्य करून घरातील कचरा रस्त्यावर किंवा उघड्यावर टाकू नये, असे आवाहन समाजमाध्यमांद्वारे नागरिकांना केले आहे.
ठाकरे गटाचा आंदोलनकर्त्यांना पाठिंबा
शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने कोपरखैरणे येथील आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. या वेळी ऐरोली विधानसभा जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्याशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून तत्काळ तोडगा काढण्याची विनंती केली. मागण्या मान्य न झाल्यास ठाकरे पक्षाचे शिष्टमंडळ महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेणार असल्याचे जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे यांनी सांगितले. या वेळी उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत मढवी, उपशहरप्रमुख महेश कोटीवाले, चंद्रकांत शेवाळे, विभागप्रमुख तथा सोलापूर लोकसभा युवासेना विस्तारक सिद्धाराम शिलवंत, शाखाप्रमुख सुहास जाधव, संजय राऊत आदी उपस्थित होते.