ISPL Season2: बिगारी काम करणारा मुलगा ते भारताचा कर्णधार... टेनिस क्रिकेटच्या 'सचिन तेंडुलकर'चा संघर्षमयी प्रवास
esakal February 10, 2025 10:45 PM

-सौरभ धनावडे

Tennis Cricket Star Krushna Satpute Struggle Story : इंडियन स्ट्रीट प्रिमिअर लीग स्पर्धा सुरु झाली आणि टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आले. ज्या खेळाकडे आधी टाइमपास म्हणून पाहिले जात होते तो खेळ पाहाण्यासाठी लोकं आता तिकीट काढून गर्दी करू लागले. क्रिकेटची आवड आहे, परंतु करियर करता येत नसलेल्या प्रतिभावान खेळाडूंना गल्ली क्रिकेटमध्येच आपली हौस भागवावी लागते. मात्र, ISPL मुळे या खेळाडूंना व्यासपीठ मिळाले आणि त्यांचा संघर्ष जगासमोर येऊ लागला. या स्पर्धेतील एका अशाच स्टार खेळाडूचा संघर्षमय प्रवास जाणून घेणार आहोत. जो बिगारी किंवा रोजंदारीवर काम करत घर चालवायचा आणि त्याला लोक आता टेनिस क्रिकेटचा सचिन तेंडुलकर म्हणून ओळखतात.

सोलापूरात जन्मलेल्या कृष्णा सातपुतेला टेनिस क्रिकेटचा 'देव' म्हटले जाते. त्याचे वडील रेल्वेत कामाला होते. पण, कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाले आणि काही दिवसांनी आईही गेली. अचानक बसलेल्या या धक्क्यांतून सावरून कृष्णाला कुटुंबाला सांभाळायचे होते. त्याची पत्नी गरोदर होती आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. ते फेडण्यासाठी कृष्णा मिळेल ते काम करायचा,कधी बिगारी काम केलं तर कधी रोजंदारीवर काम केलं. एकीकडे परिस्थिती बिकट असताना त्याने क्रिकेटकडे दुर्लक्ष केले नाही. सरावत खंड पडू दिला नाही. खांद्यावर जबाबदारी असताना आपली आवडत जपत राहिला. कृष्णा डिंग डॉन्ग या संघाकडून क्रिकेट खेळायचा. पण त्यावेळी टेनिस क्रिकेटला इतकी प्रसिद्धी नव्हती. पण तरीही कृष्णा क्रिकेट खेळत राहिला.

कृष्णा कामानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये शिफ्ट झाला. तिथे तो एका कंपनीत काम करायचा व सोबतीला क्रिकेट होतच. एकदा बॉस चिडला आणि म्हणाला, 'तुला काम काही जमणार नाही तू क्रिकेटच खेळ.' ते शब्द पट्ठ्याच्या जिव्हारी लागले. पट्ठ्याने आणखी जोमाने मेहनत केली. क्रिकेट वेडापाई जास्त कमाई नसतानाही केवळ महाराष्ट्रभर नाही तर भारतभर वणवण प्रवास केला आणि आता कृष्णाला संघात घेण्यासाठी लाखोंची बोली लागते. जसं एखादा नट किंवा अभिनेता प्रेक्षकांना चित्रपटगृह किंवा थिएटरकडे वळवतो. त्याचप्रमाणे कृष्णाने लोकांना टेनिस क्रिकेटच्या मैदानाकडे वळवलं. आज कृष्णा ज्या मैदानावर, ज्या स्टेडियममध्ये खेळत असतो तिथे त्याला पाहण्यासाठी लोक गर्दी करतात.

महेंद्र सिंग धोनीचा ट्रेडमार्क असलेला हॅलिकॉप्टर शॉट कृष्णा अगदी सहजरित्या खेळतो. याच टेनिस क्रिकेटने त्याला ओळख दिली. हळूहळू तो व्यावसायिक क्रिकेटकडे वळला. व्यावसायिक क्रिकेटच्या माध्यमातून कृष्णा संपूर्ण भारत भरात क्रिकेट खेळू लागला आणि भारताच्या टेनिस क्रिकेट संघात त्याची निवड झाली. टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत त्याने भारतीय संघांचे नेतृत्वही केले आणि सध्या सुरु असलेल्या ISPL स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामात कृष्णा दक्षिणत्य अभिनेता राम चरण याच्या फाल्कन रायझर्स हैद्राबाद संघाचा सलामीवीर फलंदाज आहे.

सकाळ डिजिटलसोबत बोलताना कृष्णा म्हणाला, "ज्याप्रमाणे IPL आहे त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेटसाठी ISPL ही स्पर्धा आहे. २००० सालापासून मी टेनिस क्रिकेट खेळायला सुरुवात केली. २००२ पासून व्यावसायिक क्रिकेट खेळायला लागलो. २००४ मध्ये मी डिंग डॉन्ग संघाकडून खेळताना नाव कमवलं. आणि आता ISPL सारख्या मोठ्या लीगमध्ये खेळणे हे माझं भाग्य आहे. २००३ साली माझे आई-वडिलांचे निधन झाले. तेव्हा माझी परिस्थित खूप हालाकीची होती. खायचे वांदे होते. १००, १०० रुपये मित्रांकडून मागायचो. अशा परिस्थितीतून मी आलो आणि आज टेनिस क्रिकेटमध्ये करिअर केलं.'

'मी सचिन तेंडुलकर सरांना ज्यावेळी खेळताना पाहायचो त्यावेळी वाटायचं की आपणही भारतीय संघात असायला हवे व बॅटींग करायला हवी. पण ज्यावेळी MS Dhoni आले त्यावेळी मी त्यांचा हॅलिकॉप्टर शॉट पाहून वेडा झालो. प्रॅक्टिस सुरु केली आणि मी देखील हॅलिकॉप्टर शॉट मारू लागलो, जो आज माझा आणि चाहत्यांचा आवडता शॉट आहे. " कृष्णा सातपुते पुढे म्हणाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.