Almatti Dam: अलमट्टीची उंची कोल्हापूर, सांगलीला बुडवणार? कर्नाटक सरकारची आडमुठी भूमिका
Saam TV February 11, 2025 08:45 AM

सांगली आणि कोल्हापूरकरांच्या पोटात गोळा आणणाऱ्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतलाय.. अलमट्टीची उंची वाढवल्यास त्याचा नेमका काय परिणाम होणार? आणि कर्नाटकच्या निर्णयावर महाराष्ट्र सरकारची भूमिका काय? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

कोल्हापूर आणि सांगलीच्या महापुरासाठी कारणीभूत ठरणाऱ्या अलमट्टी धरणाची उंची 5 मीटरने वाढवण्याचा घातकी निर्णय कर्नाटकने घेतलाय...त्यामुळे सांगली आणि कोल्हापूरकरांच्या पोटात गोळा आलाय... तर सांगली-कोल्हापूरला महापुराच्या खाईत लोटणाऱ्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकारने जल लवादात कोणताही आक्षेप नोंदवला नसल्याचं समोर आलंय.. त्यामुळे सांगलीचे खासदार विशाल पाटलांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलंय.. तर अलमट्टीबाबत सरकार अभ्यास करत असल्याचा दावा जलसंपदामंत्र्यांनी केलाय.

कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनात अलमट्टी धरणाची उंची 519 मीटरवरुन 524 मीटर करण्याला मंजूरी देण्यात आली.. त्यानंतर कृष्णा खोऱ्यातील एकाही राज्याने जल लवादात तक्रार दिली नसल्याची माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटलांनी दिलीय.. मात्र अलमट्टीची उंची वाढवल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रावर काय परिणाम होईल? पाहूयात.

पश्चिम महाराष्ट्राला का आहे अलमट्टीचा धोका?

कर्नाटक सरकारचा अलमट्टी धरणाची उंची 5 फूट उंची वाढवण्याचा निर्णय

अलमट्टी धरणामुळे पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका

सध्याच्या उंचीमुळे 2005, 2019 आणि 2021 मध्ये कोल्हापूर, सांगलीत महापूर

धरणाची उंची वाढल्यास पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती

पुराखाली येणारी गावे कायमची नष्ट होण्याचा धोका

अलमट्टीच्या उंची वाढवण्याबाबत कर्नाटकच्या आडमुठ्या भूमिकेवर आक्षेप न घेऊन महायुती सरकारने एकप्रकारे त्याला मूक संमती दिल्याचं चित्र आहे...मात्र 5 मीटरने अलमट्टीची उंची वाढवल्यास पाणी शिरोळ बंधाऱ्यापर्यंत येण्याची शक्यता आहे... त्यामुळे आता तरी महाराष्ट्र सरकार अभ्यासाच्या भूमिकेतून बाहेर येऊन कर्नाटकच्या निर्णयाला विरोध करणार की सांगली-कोल्हापूरला पुराच्या खाईत लोटणाऱ्या निर्णयाचे मूक साक्षीदार बनणार? हेच पहावं लागेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.