मुरूड (जि. लातूर) - राज्यातील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकाचे पॅनलवरील नवीन ५० सदस्यांची यादी बनवण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचे अंतिम निकाल जाहीर करण्यात आले. तब्बल आठ वर्षानंतर कार्यकारी संचालकांच्या पॅनलमधील वाढ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी ५० कार्यकारी संचालकांचे नवीन पॅनल तयार करण्यासाठी राज्याच्या सहकार विभागाकडून ता. १८ एप्रिल २०२२ ला निर्णय घेण्यात आलेला होता. तसेच परिपत्रक राज्याच्या साखर आयुक्तालयाकडून ता.३१ मे २०२२ला प्रसिद्ध करण्यात आले होते. वेगाने बदलणाऱ्या राज्यातील साखर उद्योगाच्या व्यवस्थापनाची धुरा सक्षम पणे पार पाडण्यासाठी कार्यकारी संचालक कार्यक्षम असणे गरजेचे आहे.
या संकल्पनेतून कार्यकारी संचालकांच्या पॅनल परीक्षेत आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय तत्कालीन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतला होता. या निर्णयानुसार कार्यकारी संचालकांची प्रथमच पूर्व, लेखी व मौखिक चाचणी अशा तीन टप्प्यामध्ये परीक्षा घेण्याची प्रक्रिया होती.
पहिल्या टप्प्यातील पूर्व परीक्षा ता ५ एप्रिल २०२४, दुसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षा ता ४ मे २०२४ व लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मौखिक चाचणी परीक्षा ता. १९ जुलै ते २२ जुलै दरम्यान पुण्याच्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थान येथे घेण्यात आल्या होत्या.
मौखिक चाचणी परीक्षा सुरू असतानाच लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या काही उमेदवारांनी निवड प्रक्रिया सदोष असल्याचे कारण पुढे करून मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात निवड प्रक्रियेला आव्हान दिले होते. सुनावणीत निवड प्रक्रियेस आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाकडून ता.सात फेब्रुवारी २०२५ रोजी फेटाळण्यात आली होती.
त्यानंतर वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थानने कार्यकारी संचालकांच्या पॅनल परीक्षेचे अंतिम निकाल सोमवारी (ता. १०) प्रसिद्ध केले आहेत. यामुळे आता राज्यातील सहकारी साखर कारखान्याच्या ५० कार्यकारी संचालकांचे पॅनल तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच या निकालाच्या आधारावर साखर आयुक्त अंतिम ५० पॅनलवरील उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत.