Pimpri Encroachment : पिंपरी महापालिकेकडून २७६ एकरवर 'बुलडोझर'; सहाशेहून अधिक अनधिकृत बांधकामे पाडली
esakal February 11, 2025 08:45 AM

पिंपरी - वायू, ध्वनी आणि जलप्रदूषण वाढत असून, आग लागण्याच्या घटनाही वारंवार घडत आहेत. शिवाय, विकास आराखड्यातील (डीपी) आरक्षणे विकसित करायची आहेत. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखली कुदळवाडी, जाधववाडी भागातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांच्या विरोधात शनिवारपासून (ता. ८) कारवाई सुरू केली आहे.

सोमवारपर्यंत अर्थात तीन दिवसात तब्बल २७६ एकर क्षेत्रावरील तब्बल एक कोटी २० लाख ७२ हजार चौरस फूट क्षेत्राची एक हजार ५११ अनधिकृत बांधकामे व पत्राशेडवर कारवाई केली. उद्योगनगरीच्या पन्नास वर्षांच्या व महापालिकेच्या ४० वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. २० फेब्रुवारीपर्यंत कारवाई सुरूच राहणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांचे धडक कारवाई पथक यांच्यामार्फत चिखलीतील कुदळवाडी, जाधववाडी भागात कारवाई सुरू आहे. शहरातील नियोजित विकास आरक्षणे आणि नागरिकांच्या सुविधांसाठी असलेल्या जागेवरील अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी कारवाई सुरूच राहणार आहे. सोमवारी (ता. १०) ७७ एकर क्षेत्रावरील ३३ लाख ५८ हजार १३० चौरस फूट क्षेत्राची ६८२ बांधकामे पाडण्यात आली.

असा होता बंदोबस्त

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपायुक्त मनोज लोणकर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, सुचेता पानसरे, अमित पंडित, किशोर ननवरे, उमेश ढाकणे, अजिंक्य येळे, शीतल वाकडे, श्रीकांत कोळप यांच्यासह कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता सहभागी झाले होते. सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्या आधिपत्याखाली पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार, संदीप डोईफोडे, विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त तैनात होता.

कारवाईसाठी यंत्रणा

महापालिका अतिक्रमण धडक कारवाई पथकामधील चार कार्यकारी अभियंते, १६ उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १८० जवान, ६०० पोलिस आणि मजूर कर्मचारी सहभागी झाले होते. १६ पोकलेन, आठ बुलडोझर, एक क्रेन आणि चार कटर यांचा वापर कारवाईसाठी केला. शिवाय, तीन अग्निशमन वाहने आणि दोन रुग्णवाहिकाही तैनात होत्या. महापालिका यंत्रणेसह पोलिस, महावितरण कंपनीचे अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.

कारवाईची कारणे

- कंपन्या व भंगार मालाच्या गोदामांमधून सोडल्या जाणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे इंद्रायणी नदीचे प्रदूषण वाढतंय

- रासायनिक कंपन्या आणि भंगार माल, रद्दी यामुळे वारंवार आग लागण्याच्या घटना

- अंतर्गत रस्ते अरुंद असल्यामुळे आगीची घटना घडल्यास घटनास्थळापर्यंत पोहोचण्यास अडचणी

- महापालिका विकास आराखड्यातील रस्ते, उद्याने, मैदाने, क्रीडांगणाच्या आरक्षणांवर अतिक्रमणे

सोमवारपर्यंतची कारवाई

तारीख / क्षेत्र (एकर)/ बांधकामे / क्षेत्रफळ (चौरस फूट)

८ फेब्रुवारी / ४२ / २२२ / १८ लाख ३६ हजार

९ फेब्रुवारी / १५७ / ६०७ / ६८ लाख ७८ हजार

१० फेब्रुवारी / ७७ / ६८२ / ३३ लाख ५८ हजार

एकूण / २७६ / १,५११ / १ कोटी २० लाख ७२ हजार

‘शहरातील नियोजित विकास आरक्षणे आणि नागरिकांच्या सुविधांसाठी असलेल्या जागेवरील अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने, तसेच अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही कारवाई चालू राहणार आहे.

- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका, पिंपरी-चिंचवड

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.