संपाच्या पहिल्याच दिवशी नवी मुंबईत ‘कचराकोंडी’, देशात तिसऱ्या क्रमांकाच्या सुंदर शहरात कचऱ्याचे ढीग लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
Marathi February 11, 2025 03:24 PM

समान काम समान वेतन हे धोरण लागू करण्यास नवी मुंबई महापालिका प्रशासनाने टाळाटाळ केल्यामुळे आजपासून सुमारे 8 हजार कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. संपाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांची कचराकोंडी झाली. देशात तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ आणि सुंदर शहर अशी ख्याती असलेल्या नवी मुंबईत सर्वच रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग लागले. सर्व कामगारांचा प्रखर विरोध पाहून प्रशासनाने तातडीने कामगारांना चर्चेसाठी बोलावले आणि याप्रकरणी तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा, आरोग्य, पाणीपुरवठा, स्मशानभूमी, शवविच्छेदन आणि उद्यान आदी विभागांमध्ये 8 हजार 50 कंत्राटी कामगार काम करीत आहेत. या कामगारांनी समान काम समान वेतन धोरण लागू करण्याची मागणी केली. त्यासाठी एक महिना उपोषण केले. मात्र प्रशासनाने हे धोरण लागू न केल्यामुळे अखेर घनकचरा विभागातील कामगारांनी आजपासून आंदोलन सुरू केले. आंदोलन सर्वच आघाड्यांवर यशस्वी झाल्यानंतर प्रशासनाने सकाळीच कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावले. दुपारी 1 वाजता बैठक सुरू झाली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, उपायुक्त शरद पवार, डॉ. अजय गडदे, समाज समता कामगार संघटनेचे सरचिटणीस मंगेश लाड आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रशासनाने समान काम समान वेतन धोरणाबाबत तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले.

लोकप्रतिनिधी नसल्याने ही वेळ

समान काम समान वेतन ही कामगारांची मागणी अनेक वर्षांपासून आहे. ती आतापर्यंत मार्गी लागणे आवश्यक होते. मात्र सभागृहात लोकप्रतिनिधी नसल्यामुळे हा प्रश्न लावून धरला गेला नाही. गेल्या पाच वर्षांपासून महापालिकेचा गाडा हाकणाऱ्या प्रशासकांनी कामगारांची बाजू समजावून घेतली नाही. समान काम समान वेतन हा त्यांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना कामगारांच्या पाठीशी

नवी मुंबई हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सुंदर आणि स्वच्छ शहर आहे. हा क्रमांक मिळवून देण्यात सफाई कामगारांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कोणतेही आढेवेढे न घेता त्यांच्या मागण्या मान्य करणे आवश्यक आहे. शिवसेना या कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे यांनी दिली आहे.

तोडगा काढण्यासाठी समितीची स्थापना

कंत्राटी कामगारांनी केलेल्या मागणीनुसार याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी शुक्रवारीच समितीची स्थापना केलेली आहे. या समितीची बैठक येत्या बुधवारी होणार आहे. त्या बैठकीत कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी बोलावण्यात येणार आहे. दोन महिन्यांतच या समितीचा अहवाल प्रसिद्ध होणार आहे. कामगारांना न्याय देण्यासाठी महापालिका प्रशासन सकारात्मक आहे. कामगारांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे व्यक्त केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.