नवी मुंबई : शहर व औद्यौगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोकडून माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेतील अर्जदारांची अंतिम यादी प्रकाशित करण्यात आली आहे. सिडकोनं माझे पसंतीचे घर योजनेअंतर्गत 26502 घरांच्या विक्रीसाठी अर्ज मागवले होते. अंतिम यादीतील आकडेवारीनुसार 21399 अर्जदारांची बुकिंग शुल्क जमा केलं आहे.
सिडकोनं त्यांच्या सिडकोहोम्स डॉट कॉम या वेबसाईटवर अर्जदारांची अंतिम यादी ही लिंक उपलब्ध करुन दिली आहे. या लिंकवर क्लिक केल्यास अर्जदारांची नावं पाहायला मिळतात. त्या वेबपेजवर तुमचा अर्जाचा नोंदणी क्रमांक टाकून सर्च करा तुम्हाला तुमचं नाव अंतिम यादीत पाहायला मिळेल.
सिडकोनं खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, कळंबोली यासह इतर भागातील घरांसाठी माझे पंसतीचे सिडकोचे घर ही योजना आणली होती. एकूण 26502 घरांची विक्री केली जाणार होती. मात्र,सिडकोनं अनेकदा मुदतवाढ देऊन देखील अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. बुकिंग शुल्क आणि पात्र अर्जदारांची एकूण संख्या अंतिम यादीतून समोर आली आहे. ती संख्या 21399 इतकी आहे. त्यामुळं 26502 घरांच्या विक्रीसाठी काढलेल्या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
सिडकोनं माझे पसंतीचे घर योजनेतील अर्जदारांची अंतिम यादी काल प्रकाशित झाली आहे. आता सोडतीचा अंतिम टप्पा बाकी आहे. सिडकोकडून सोडतीसाठी 15 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. सकाळी 11.20 वाजता सोडतीचा कार्यक्रम रायगड इस्टेट-फेज I, भूखंड क्रमांक1, सेक्टर-28 , तळोजा पाचनंद येथे होणार आहे.
सिडकोनं ऑक्टोबर महिन्यात माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेतील 26502 घरांच्या विक्रीसाठी अर्ज मागवले. पहिल्यांदा अर्जदारांना नोंदणी करण्यास सांगण्यात आली. त्यानंतर अर्जाचं शुल्क देखील जमा करण्यास सांगण्यात आलं. मात्र, योजनेच्या सुरुवातीला घरांच्या किमती जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. सिडकोच्या घरांच्या किमती निश्चत केल्यानंतर अनेक अर्जदारांना त्या आवाक्याबाहेरच्या असल्यानं त्यांनी पसंतीक्रम नोंदवून बुकिंग शुल्क जमा केलं नाही. सिडकोकडून चार ते पाचवेळा मुदतवाढ दिल्यानंतर अखेर 21399 अर्जदारांनी 26502 घरांसाठी अर्ज केल्याचं अंतिम यादीतून स्पष्ट झालं आहे.
नवी मुंबईत घर घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी घरांच्या किमती कमी करण्याची मागणी केली होती. मात्र, सिडकोनं ज्या सोयी सुविधा दिल्या जात आहेत त्याचा विचार करता किंमती योग्य असल्याचं म्हटलं होतं.
इतर बातम्या :
अधिक पाहा..