अभिजीत देशमुख, साम टीव्ही
कल्याण : काही दिवसांपूर्वी कल्याणच्या लक्ष्मी मार्केटमध्ये एका शेतकऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. जखमी बारकू मढवी हा त्याचा भाऊ कृष्णा मढवी याला वडिलोपार्जित प्रॉपर्टीत हिस्सा देत नसल्याने संतापलेल्या कृष्णा मढवी याने कोयत्याने बारकूवर कोयत्याने हल्ला केला होता. या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी हल्लेखोर आरोपी कृष्णा मढवी याला बेड्या ठोकल्या आहेत.
कल्याणमधील लक्ष्मी मार्केटमध्ये शेतकऱ्यावर कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला झाला होता. कल्याणच्या लक्ष्मी मार्केटमध्ये पहाटे सहा वाजता गाय बैलांकरिता चारा घेण्यासाठी बारकू मढवी आले होते. ते मार्केटमध्ये चारा घत असताना त्यांच्या मागून आलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात बारकू गंभीररित्या जखमी झाले.
बारकूचा मृत्यू झाला आहे, असं वाटल्याने हल्लेखोर व्यक्ती तिथून पसार झाला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बारकूला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. या प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी बारकू मढवी याच्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास सुरु केला. तपासासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासला असता सीसीटीव्हीत बारकूवर हल्ला करणारा हल्लेखोर दिसत होता. मात्र हल्लेखोराने टोक्यावर टोपी आणि तोंडावर मास्क घातला होता. त्यामुळे सीसीटीव्हीत दिसणारा हल्लेखोर नेमका कोण असा प्रश्न उपस्थित झाला.
या प्रकरणात वरिष्ठ पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी विकास मडके यांनी तपासाची चक्रे फिरवली. अखेरीस अवघ्या तीन दिवसात पोलिसांनी हल्लेखोराला पकडले. हल्लेखोराला पकडल्यानंतर तपासात पोलिसांसमोर अतिशय धक्कादायक माहिती समोर आली.
काय आहे प्रकरण?बारकू मढवी हा त्याचा भाऊ कृष्णा मढवी याला वडिलोपार्जित जमीनीत हिस्सा देत नव्हता. या गोष्टीचा राग कृष्णा याच्या मनात होता. त्यांनी या रागातून कृष्णाने बारकूवर कोयत्याने हल्ला करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हल्ला करणारा डोक्यावर टोपी आणि तोंडावर मास्क घालून होता. कृष्णाने कोयत्याने बारकू मढवी याच्यावर एकामागे एक वार करीत होता. बारकू मेला असल्याचे समजून आरोपी पळून गेला. मात्र बारकू हा वाचले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.