भारतीय क्रिकेट संघ मायदेशात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी अखेरचा आणि एकदिवसीय सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 12 फेब्रुवारीला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने याआधीचे सलग 2 सामने जिंकून मालिकेवर नाव कोरलं आहे. टीम इंडियाने दोन्ही सामने हे 4 विकेट्सने जिंकले. कर्णधार रोहित शर्मा याने दुसऱ्या सामन्यात झंझावाती शतकी खेळी करत टीम इंडियाला जिंकून दिलं. रोहितने इंग्लंडविरुद्ध 90 बॉलमध्ये 119 रन्स केल्या. रोहित या खेळीमुळे सचिन तेंडुलकर याच्या वर्ल्ड रेकॉर्डच्या जवळ पोहचला आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये होणार आहे. रोहितकडे तिसऱ्या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनला मागे टाकून वेगवान 11 हजार धावा करणारा दुसरा फलंदाज होण्याची संधी आहे. वनडे क्रिकेटमध्ये वेगवान 11 हजार धावांचा विश्व विक्रम हा विराट कोहली याच्या नावावर आहे.
रोहितने आतापर्यंत 267 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10 हजार 987 धावा केल्या आहेत. रोहित 11 हजार एकदिवसीय धावांपासून फक्त 13 धावा दूर आहे. त्यामुळे रोहितकडे इंग्लंडविरुद्ध 268 व्या सामन्यात 11 हजार धावा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आहे.
विराट कोहली याच्या नावावर वेगवान 11 हजार एकदिवसीय धावांचा विश्वविक्रम आहे. विराटने 2019 साली पाकिस्तानविरुद्ध कारकीर्दीतील 230 व्या सामन्यात 11 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. तर सचिन तेंडुलकर याने इंग्लंडविरुद्ध कारकीर्दीतील 268 व्या सामन्यात 11 हजार धावा केल्या होत्या.
इंग्लंड टीम : फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर, साकिब महमूद, गुस ऍटकिन्सन, मार्क वुड, जेमी ओव्हरटन आणि जेमी स्मिथ.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर आणि अर्शदीप सिंह.