पुणे - सरकारी कर्मचारी अधिकारी यांची दर तीन ते चार वर्षांनी बदली होणे अपेक्षित असते. तोच नियम आरोग्य विभागातील डॉक्टरांनाही लागू आहे. परंतु, जिल्हा रुग्णालयात काही डॉक्टर व अधिकारी असेही आहेत की ते पुण्यात येऊन त्यांना १२ ते १५ वर्षे झाले तरी पुणे सोडायला तयार नाहीत.
जरी त्यांची बदली दुसरीकडे केली तरी त्यांनी थेट मंत्रालयात ‘ओळख’ वापरून आठवड्यातच बदली रद्द करतात. तर कोणी मनोरुग्णालयात बदली करून घेत प्रतिनियुक्तीवर जिल्हा रुग्णालयात आले. त्यामुळे, इतर पात्र डॉक्टरांनी कधी पुण्यात सेवा न बजावता केवळ ग्रामीण भागातच सेवा बजावायची का, असा प्रश्न या डॉक्टरांकडून व आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
मंत्रालयात होते ‘सेटिंग’...
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात आरोग्य विभागाने जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, विशेषज्ञ या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. या बदलल्या सचिवांच्या आदेशाने होतात. त्यामध्ये ते जिल्हा रुग्णालयात गेल्या १५ वर्षांपासून असलेल्या अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञाची साताऱ्यातील सामान्य रुग्णालयात बदली झाली होती.
परंतु, त्यांनी आठवडाभरातच मंत्रालयात ‘सेटिंग’ करून ती बदली रद्द करत पुन्हा जिल्हा रुग्णालयात आले. तसेच तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांची बदली जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पदावर केली होती. अधीक्षक यांनी बदलीच्या ठिकाणचे (जुन्नर) येथील ठिकाण सोडणे अपेक्षित नाही. मात्र, जिल्हा रुग्णालयातीलच सरकारी निवास अद्याप सोडलेला नाही. तसेच त्या जिल्हा रुग्णालयात आठवड्यातील दोन दिवस असतात, अशी माहिती येथील सूत्रांनी दिली.
मनोरुग्णांवर उपचार करतेय बालरोगतज्ज्ञ!
जिल्हा रुग्णालयातील महिला बालरोगतज्ज्ञाची बदली नंदुरबारला झाली होती. त्यांनी ती रद्द करून पुन्हा येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदाची जागा पटकावली. तर अतिदक्षता विभागतज्ज्ञाची बदली सातारा येथे झाली होती. त्यांनीही येरवडा मनोरुग्णालयात बदली करून घेतली.
आता ते प्रतिनियुक्तीवर जिल्हा रुग्णालयात तीन दिवस असतात. इतर डॉक्टरांचीही बदली दुसरीकडे झाली परंतु, त्यांची ‘वर’पर्यंत पोहोच नसल्याने ती निमुटपणे स्वीकारली. हा प्रकार म्हणजे आरोग्य खात्याचा दुटप्पीपणा असल्याचा आरोप आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते शरत शेट्टी यांनी केला आहे.
याबाबत आरोग्य विभागाचे सचिव निपुन विनायक यांना या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत विचारले असता त्यांनी मीटींग मध्ये असल्याचे सांगत प्रतिसाद दिला नाही.