सांगोला - आमदार नसलो तरी तालुक्यातील प्रलंबित कामे मार्गी लावणारच. केंद्रात व राज्यात सत्ता असल्यामुळे तालुक्यातिल प्रश्न सोडवण्यासाठी अडचणी येणार नाहीत. काही नेत्यांच्या पक्षांतराबाबत बोलणार नाही, मी शिंदे साहेबांचा एकनिष्ठ भक्त असल्याचे प्रतिपादन माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.
गेल्या आठवड्यात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दोन वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे सर्वत्रच वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये त्यावेळी आमदार राहिलेले शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यात सुमारे साडेपाच हजार कोटींच्या विकास कामांसाठी निधी आणला होता.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सर्वात पुढे असणारे शहाजीबापू हे एकनाथ एकनाथ शिंदे यांच्या अतिशय जवळचे मानले जातात. या विधानसभा निवडणुकीमध्ये शहाजीबापू पाटलांचा पराभव झाल्यामुळे तसेच गेल्या आठवड्यात दोन वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यामुळे आमदार शहाजीबापू पाटलांचे राजकीय पुनर्वसन होणार का? याबाबत सर्वत्र मत मतांतरे व्यक्त होत आहेत.
या भेटीविषयी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले की, गेल्या आठवड्यात दोन वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली. या भेटीमध्ये तालुक्यातील प्रलंबित विकास कामांबाबत सविस्तर चर्चा केली. काही प्रकल्प तालुक्यात नव्याने होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. शिंदे साहेबांबरोबर राजकीय चर्चाही झाली.
फक्त आमदार असल्यावरच कामे होतात असे नाही तर मी आमदार नसतानाही आता कामे करून दाखवणार आहे. पराभवाची कारणमीमांसा करण्यापेक्षा मी पुढील कामांच्या बाबत कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करीत आहे. माझ्या कार्यकर्त्यांची कोणतीही कामे आढणार नाहीत व तालुक्यातील विकास कामांचा निधीही मी कमी पडू देणार नाही असे आश्वासनही आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिले.
युती-आघाड्याबाबत निवडणूका आल्यावर पाहू -
माजी आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील या दोन्ही नेत्यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकत्रित यावे अशी चर्चा कार्यकर्त्यांमधून सुरू आहे. यासाठी दोन्ही बाजूंचे काही कार्यकर्ते बैठकाही घेत असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत बोलताना शहाजीबापू म्हणाले की, आता तर लगेच निवडणुका कोणत्याही नाहीत. निवडणुका आल्यावर कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन, सर्व बाजूंनी राजकीय विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
मत विभाजनामुळेच माझा पराभव -
माझ्या पराभवाबाबत जास्त काही बोलण्याची गरज नाही. पराभव कशामुळे झाला हे तालुक्यातील जनतेला माहित आहे. मत विभाजन हे त्यातील प्रमुख कारण आहे. मी त्यावर सारखी चर्चा करण्याचे कारण नाही. राजकारणात नेहमी वर्तमान व भविष्याचा जास्त विचार करावा लागतो. मी आता तालुक्यातील पुढील प्रश्नांबाबतच विचार करणार आहे.