'वेव्ज' संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Inshorts Marathi February 12, 2025 01:45 AM

मुंबई, दि. ११ : केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने मुंबईमध्ये ऑडीओ व्हिज्युअल एंटरटेंटमेंट समिट (वेव्ज) 2025 या मनोरंजन क्षेत्रातील जागतिक संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. 1 ते 4 मे 2025 दरम्यान ‘जिओ कन्व्हेक्शन सेंटर’ येथे हे संमेलन होईल. जगाला भारताच्या मनोरंजन विश्वातील कला गुण, सृजनशीलता दाखविण्याची ही नामी संधी आहे. या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडीओ व्हिज्युअल एंटरटेंटमेंट समिट (वेव्ज) बाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात या संमेलनाचा उल्लेख केला आहे. कला, चित्रपट, माध्यमे, मनोरंजन क्षेत्रातील भारताची सृजनशीलता खूप मोठी आहे. भारताची ही नवी ओळख जगाला करून देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी संकल्पना आहे. ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी या संमेलनाच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभारही मानले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीस सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, केंद्रीय माहिती व प्रसारण सचिव संजय जाजू, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हितेश जैन, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, विशेष पोलीस देवेन भारती आदी उपस्थित होते.

संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी राज्य शासनाकडून समन्वयासाठी एक आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. केंद्रीय प्रसारण मंत्रालयाच्या सेाहळा आयोजनाच्या अनुषंगाने असणाऱ्या आवश्यकता, अडचणी, राज्य शासनाकडून असणाऱ्या अपेक्षा यासाठी नियमित संवादासाठी यंत्रणा तयार करावी, अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

‘वेव्ज ‘ संमेलनात प्रदर्शन असणार आहे. यामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष दालनाची व्यवस्था करावी. या दालनातून महाराष्ट्राचे कलाविश्व जगाला दाखवावे. परिषदेसाठी जगातून येणाऱ्या मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीमत्वाचे स्वागत महाराष्ट्र करेल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. केंद्रीय सचिव जाजू यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून परिषदेची माहिती दिली. बैठकीस सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, पर्यटन व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

The post first appeared on .

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.