- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
संवादासाठी संतश्रेष्ठ तुकारामांचा अभंग प्रसिद्ध आहेच. अशा स्वसंवादासाठी मीच माझ्याशी गप्पा मारल्या. एक दिवस मला अचानक चौकसवृत्तीचा राजू भेटला. तो तसा नेहमीच भेटतो, परंतु एखादा विचारांचा किडा चावला की तो बोलतो. विचारतो काही बाही,
‘तर, काका, ते ५‘S म्हणजे काय रे?’’ राजूचा थेट प्रश्न. मी म्हणालो, ‘‘ही एक कार्यस्थळ व्यवस्थापन पद्धत आहे. टोयोटाचे अभियंता ताईची ओहनो यांनी ही पद्धत लोकप्रिय केली. या पद्धतीची उत्पत्ती सोळाव्या शतकात व्हेनिसमध्ये जहाजबांधणी व्यावसायिकांनी केली असली तरी, ही पद्धत अधिकृतपणे १९७०मध्ये ओहनो यांनी टोयोटोचे अध्यक्ष किचिरो यांच्यासमवेत विकसित केली. ज्याने, शिस्तबद्ध उत्पादनाचा पाया विकसित झाला.
५‘S’ पद्धत पाच जपानी शब्दांवर लक्ष केंद्रित करते - seiri, seiton, seis, seiketsu, आणि shitsuke. ज्याचे इंग्लिश भाषांतर ‘सॉर्ट’, ‘सेट इन ऑर्डर’, ‘शाईन’, ‘स्टँडर्डायझेशन’ आणि ‘सस्टेन’ म्हणून केले जाते.
टोयोटाच्या या उत्पादन प्रणालीमुळे ओहनोच्या योगदानाचा आणि ५‘S’ च्या विकासाचा जगभरातील उत्पादन पद्धतींवर लक्षणीय परिणाम झाला.
ज्यामध्ये कार्यक्षमता, उत्पादकता वाढणे, टाकाऊ वस्तू कमी करणे, कचरा फेकून देणे आणि कामाच्या ठिकाणचे उत्तम व्यवस्थापन, शिस्त, वस्तू जागच्या जागी हव्या त्या नेमक्या वेळी सापडणे असे बरेच फायदे ५‘S’ या कार्यप्रणालीने सिद्ध केलेले आहेत.
‘पण या पद्धतीचा मर्त्य मानवाला उपयोग काय?’ राजू विचारता झाला.
‘ताण निवारण्यासाठी ध्यानधारणेचा सराव करताना एके दिवशी, मनासमोर असे तरळून गेले की ५‘S’ ही कार्यप्रणाली मनव्यवस्थापनासाठीही उपयुक्त ठरू शकते. प्रयोगाअंती औद्योगिक उत्पादनासाठी उत्तम ठरणारी ५‘S’ ही कार्यप्रणाली मन व्यापार व्यवस्थापनासाठी उपयोगाची आहे, अशा निष्कर्षापर्यंत मी आलो.
तर प्रत्येक ‘S’ चा उपयोग मनाला कसा लागू करायचा ते आपण बघूयात!
तत्पूर्वी म्हणजे ५‘S’कडे जाण्यापूर्वी एक स्वयंशोधाची प्रक्रिया करून घ्यावी लागणार असल्याचे राजूला सांगितले.
ती प्रक्रिया म्हणजे ‘SWOC ANALYSIS.’ स्वतःमधील बलस्थाने, कमतरता, बलस्थानांवर आधारित संधी आणि कमतरता यामुळे उभी राहणारी आव्हाने, यांचा शोध घेणे. हा शोध नेमका कसा घ्यायचा? त्यासाठी पूर्वतयारी कशी करायची? हे जरा वेगळेच आणि रंजक आणि उत्सुकता वाढवणारे प्रकरण आहे. स्वतःमध्ये डोकावून बघण्याची, मी स्वतःच्याच आरशात कसा दिसतो, हे बघण्याची दृष्टी या स्वयंशोध प्रक्रियेमुळे प्राप्त होते. खूप गांभीर्याने करावयाची बाब आहे ही. ही प्रक्रिया आधी करून घे आणि नंतर ५‘S’ कडे वळूया!
ओक्के म्हणत राजू हात झटकून उठला.
‘कुठे निघालास रे?’ मी विचारले.
‘शांत बसून गांभीर्याने विचार करायची ही बाब आहे, असेच तू म्हणालास ना? त्याचा विचार करतो.’ पुढचे काही ऐकून घ्यायच्या आत राजू अंतर्धान पावला. ‘SWOC ANALYSIS’ साठी पूर्वतयारी करून तो माझ्याकडे येण्याची वाट बघत मी स्वतःमध्येच गर्क झालो.