सकाळपासून मूड चांगला नव्हता. काय करावं? दोन-तीन मित्रांना फोन केले. कुठे जाऊ या? काही मित्रांनी ‘कुंभमेळ्याला जावं’ असं सुचवलं. त्यांना फ्रेंडलिस्टमधून काढून टाकलं. दोघातिघा मित्रांना मी म्हटलं की, एखादं ‘ब’ आद्याक्षरानं सुरु होणारं शहर आहे का? तिथं जाऊ या!’ एकाने पिंपळगाव बसवंत हे गाव सुचवलं. पण त्यात पिंपळगाव आहे. दुसऱ्यानं बुऱ्हाणपूर सुचवलं. दोघांनाही फ्रेंडलिस्टमधून कटाप केलं. एकाने बँकॉक असं म्हटलं. त्याला म्हटलं, ‘‘सौ करोड की बात बोली तुमने! चलो! बॅग भरो, निकल पडो!’’
कात्रजच्या घाटात होतो. तिथून गपचूप सटकलो आणि लोहगाव विमानतळावर आलो. लोहगावला बँकॉकला जाणारी खूप विमानं उभी असतात. स्वारगेटला बसेस उभ्या असतात तशा. मग एका विमान कंपनीच्या माणसाला विचारलं, ‘बँकॉक जाने का है, कितना लेगा!’ तो म्हणाला, ‘वैसे एक करोड होता है, लेकिन आप के लिए अडुसष्ट लाख में लेके जाऊंगा, टोल का खर्चा अलग देना पडेंगा!’ मी माझ्या हातानं मीटर डाऊन करुन विमानात बसलो…उडालं विमान!!
बँकॉक हे अतिशय निसर्गरम्य, आणि आतिथ्यशील ठिकाण आहे. इथे येणाऱ्या पाहुण्यांचा इतका पाहुणचार केला जातो की विचारु नका, आणि आम्ही सांगत नाही! बँकॉकला मी नेहमी जातो. तिथे गेल्यावर मला खूप बरं वाटतं. मन शांत होतं. महाराष्ट्रातलं वातावरण सध्या चांगलं नाही. बघावं तिथं नुसती वादावादी आणि धुसफूस. बँकॉकला ना धुसफूस, ना वादावादी.
तिथे योगासनांचे अनेक क्लासेस चालतात. प्राणायाम शिकवतात. अतिशय पवित्र वातावरण असतं. तिथले लोक खूप नम्र आहेत. वाकून वाकून नमस्कार करतात. समोर आले की वाकतातच. पाहुण्यांनाही बरं वाटतं.
सुट्टी घालवायला बरीच मंडळी या ठिकाणी येतात. शॉपिंगलासुध्दा चांगली जागा आहे. आठ-दहा दिवस राहून परतलं की नव्या जोमाने माणूस कामाला लागतो. तसाच यावेळेसही गेलो. विमानात बसलो, आणि मला झोप कोसळली. कुर्सी की पेटी ढिली करुन मी झोपलोच. पण…
…पण पुढे पप्पांनी सगळा घोटाळा केला! मी लोहगाव विमानतळावर साध्याश्या छोट्या मोटारीने गपचूप सटकलो, हे कळल्यावर त्यांना टेन्शन आलं. आमचे पप्पा एकदा ठरवलं ना की स्वत:चंही ऐकत नाहीत. (भाषांतर : एक बार कमिटमेंट कर ली तो खुद की भी नहीं सुनता!) त्यांनी थेट पोलिसांनाच सांगितलं. ‘कहां है मेला लाडला, ढूंढो उसकू!’
एरवी माणूस गायब असलं तर पोलिस सांगतात की, ‘येईल परत तुमचा मुलगा! ४८ तासांनंतर कंप्लेंटचं बघू!’ पण पप्पांची वटच अशी की सरकारी यंत्रणा थरथरलीच. पप्पांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच फोन लावला म्हणे. मुख्यमंत्री म्हणाले, ‘बघतो, सांगतो!’ पप्पांनी मग लाडक्या उपमुख्यमंत्र्यांना फोन केला म्हणे. पण ते स्वत:च कुठे तरी हरवल्यासारखे होते. ‘मैं कहां हूं?’ असं त्यांनीच पप्पांना विचारलं. पप्पा शेवटी पोलिस ठाण्यातच जाऊन बसले.
पुणे पोलिसांसारखं कार्यक्षम आणि तत्पर पोलिस दल उभ्या देशात कुठे नसेल! माझं विमान अंदमान निकोबार पर्यंत जेमतेम पोचलं होतं, तेवढ्यात पायलटला पुणे पोलिसांचा फोन, ‘यू टर्न मार, यू टर्न मार!’ शेवटी सिग्नल तोडून यू टर्न मारला. गोल वळून विमान थेट चेन्नईत!!
..रात्री विमान उतरताना मला जाग आली. खाली उतरतो तो काय, कुठलं बँकॉक? आपलं पुणंच होतं.
अशी झाली आमची बँकॉकची सहल! मज्जा!!