Industry Growth : पुणे जिल्ह्यात उद्योगवाढीचा अंदाज; ८४ टक्के कंपन्या सकारात्मक; 'एमसीसीआयए'च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
esakal February 12, 2025 04:45 PM

मध्यम : जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राची स्थिती आणि त्याची अपेक्षा समजून घेण्यासाठी ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर’च्या (एमसीसीआयए) तिसऱ्या मासिक सर्वेक्षणात जिल्ह्यातील १०८ कंपन्यांपैकी ८४ टक्के कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षात सलग दुसऱ्या महिन्यात सकारात्मक वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.

गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा २० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा असलेल्या कंपन्यांची टक्केवारी २८ वरून २६ वर घसरण झाली आहे, तर चालू आर्थिक वर्षात उद्योगांची उलाढाल घटेल, अशी शक्यता वर्तविणाऱ्या कंपन्यांची टक्केवारी पाच टक्क्यांवरून सहा टक्क्यांवर वाढली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात उद्योगांची उलाढाल घटेल अशी शक्यता वर्तविणाऱ्या कंपन्यांची संख्या पहिल्या मासिक सर्वेक्षणात नऊ टक्के होती. दुसऱ्या मासिक सर्वेक्षणात त्यात घट होऊन पाच टक्के कंपन्यांनी उलाढालीत घट होईल, असे सर्वेक्षणादरम्यान सांगितले होते. तिसऱ्या सर्वेक्षणात त्यात एक टक्क्याने वाढ होऊन सहा टक्के कंपन्यांनी घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

दहा ते वीस टक्के वाढीचा अंदाज असलेल्या कंपन्यांची संख्या पहिल्या मासिक सर्वेक्षणात २६ टक्के, दुसऱ्या सर्वेक्षणात ३२ टक्क्यांवर पोचली होती, तर तिसऱ्या सर्वेक्षणात ही संख्या ३६ टक्क्यांवर पोचली आहे. एक ते दहा टक्के वाढ अपेक्षित असलेल्या कंपन्यांची संख्याही अनुक्रमे १९ टक्के, २४ टक्के आणि २२ टक्के अशी आहे.

महत्त्वाचे मुद्दे
  • संरक्षण आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील कंपन्यांची सकारात्मक वाढीची अपेक्षा कायम

  • सहा टक्के कंपन्यांनी घट होण्याचा अंदाज

  • २० टक्के उत्पन्न वाढीची शक्यता असलेल्या कंपन्यांची संख्या घटली

सर्वेक्षणात सहभागी कंपन्यांचे प्रकार एकूण १०८

  • सूक्ष्म - ६१

  • लघू - ३२

  • मध्यम - १०

  • मोठी- 5

कंपन्यांनी वर्तविलेला अंदाज (टक्क्यांत)

  • वाढीचा अंदाज डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी

  • १ ते १० १९ २४ २२

  • १० ते २० २६ ३२ ३६

  • २० हून अधिक ३७ २८ २६

  • वाढ होणार नाही ९ ११ १०

  • घट होईल ९ ५ ६

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.