Pune : पुरणपोळीत पुरण कमी घातलं! ग्राहकाचा पारा चढला, स्नॅक्स सेंटर चालकालाच हाणला
Saam TV February 12, 2025 04:45 PM

अक्षय बडवे/ साम टिव्ही न्यूज

पुण्यातील वाघोली परिसरात पुरणपोळीतील पुरण कमी असल्यावरून वाद निर्माण होऊन मारहाणीची आणि शिवीगाळी करण्याची घटना घडली आहे. वाघोली येथील आस्वाद ५१ या स्नॅक्स सेंटरमध्ये मंगळवारी सकाळी ९.१५ वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली असून आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे "आस्वाद ५१" नावाचे स्नॅक्स सेंटर आहे. सकाळी दोन ग्राहकांनी स्नॅक्स सेंटरमध्ये येऊन पुरणपोळी ऑर्डर केली. मात्र, खाताना त्या पुरणपोळीत पुरण कमी असल्याचा आरोप करून ग्राहकांनी वाद घातला. या वादाच्या वेळी ग्राहकांपैकी एकाने स्नॅक्स सेंटर चालकाला आधी शिवीगाळ केली आणि नंतर खुर्चीने मारहाण केली.

वाद मिटवण्यासाठी फिर्यादी यांची बहीण मधे आली असता, आरोपींनी तिलाही शिवीगाळ केली आणि मारहाण करत धमक्या दिल्या. या सगळ्या प्रकारानंतर आरोपी आपल्या साथीदारासोबत बिल न देता स्नॅक्स सेंटरमधून निघून गेले. या घटनेनंतर स्नॅक्स सेंटर चालकाने वाघोली तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला आहे. मारहाणीच्या आरोपाखाली आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

सामान्यतः ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये किरकोळ वाद होण्याची शक्यता असते, परंतु या घटनेत वादाला हिंसक वळण लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पुरणपोळीतील पुरणाच्या प्रमाणावरून सुरू झालेला वाद थेट शिवीगाळ आणि मारहाणीपर्यंत पोहोचल्याने ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे. या प्रकारामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांकडून तातडीने मागणी करण्यात येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.