घरफोडीचे अर्धशतक
सराईत चोरट्यासह साथीदार पोलिसांच्या जाळ्यात
५४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; गुन्हे शाखेची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : कल्याण, ठाणे, भिंवडी, बदलापूर, अंबरनाथ परिसरात घरफोडी करणाऱ्या लक्ष्मण सुरेश शिवशरण (४७) या सराईत चोरट्यासह त्याचा साथीदार सुकेश मुददणा कोटीयन (५५ ) या दुकलीला ठाणे शहर पोलिसांनी अटक केली. यातील लक्ष्मण शिवशरण याने ठाणे शहर आयुक्तालयातील जवळपास सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी केलेल्या तब्बल ५० गुन्ह्यांची कबुली दिली.
त्या गुन्ह्यांपैकी काही गुन्ह्यांमधील दागिन्यांसह रोख रक्कम असा ५४ लाखांहून अधिकचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केला आहे. तसेच त्याच्यावर यापूर्वी ३२ गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखा उपआयुक्त अमरसिंह जाधव यांनी मंगळवारी (ता. ११) एका पत्रकार परिषदेत दिली.
विष्णुनगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास कल्याण गुन्हे शाखा करत होती. त्या गुन्ह्यातील घटनास्थळी व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयित म्हणून भिवंडीतील लक्ष्मण शिवशरण याला ताब्यात घेत चौकशी केली. त्या वेळी त्याने गुन्ह्याची कबुली देत ते सोने त्याने सुकेश याला विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला अटक केली. याचदरम्यान लक्ष्मण याने अशाप्रकारे एकूण ५० गुन्ह्यांची कबुली दिली. त्यापैकी काही गुन्ह्यांमधील ५३ लाख ४१ हजार २८० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ७८ हजार ९०० रुपये रोख, असा एकूण ५४ लाख २० हजार १८० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष उगलमुगले, पोलिस उपनिरीक्षक विनोद पाटील, पोलिस अंमलदार दत्ताराम भोसले, अशोक पवार, बालाजी शिंदे, आदिक जाधव, विलास कडू, अनुप कामत, प्रशांत वानखेडे आदी पथकाने केली.
लक्ष्मण याच्यावर यापूर्वी ठाणे आणि नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात ३२ गुन्हे दाखल आहेत. त्यामधील एक गुन्हा हा वाशी एपीएमसी पोलिस ठाण्यातील आहे. तो मूळचा सोलापूरचा असून, सध्या तो भिवंडीतील कशेळी गावात राहात आहे, तर त्याचा साथीदार सुकेश हा मूळ मंगलोरचा आहे. सध्या तो मिरा-भाईंदर परिसरात राहात आहे. या गुन्ह्यात अजून त्याचे काही साथीदार आहेत का? तसेच चोरीच्या इतर गुन्ह्यांतील मुद्देमाल त्यांनी कुठे ठेवला किंवा विक्री केला याचा तपास सुरू आहे.