पेठमाप-मुरादपूर पुलाचे काम अंतिम टप्प्यात
esakal February 12, 2025 11:45 PM

- rat११p६.jpg -
P२५N४४५१४
चिपळूण ः शहरातील पेठमाप मुरादपूर भागाला जोडणाऱ्या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
---
पेठमाप-मुरादपूर पुलाचे काम अंतिम टप्प्यात
पावसाळ्यातील गैरसोय दूर ; जोडरस्त्याच्या निविदा प्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ : पेठमाप मुरादपूर पुलाच्या कामाने गती घेतली असून, फेब्रुवारीअखेर या पुलाचे काम पूर्ण होईल. जोडरस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून, त्यानंतर खऱ्या अर्थाने या पुलाचे काम पूर्ण होणार आहे. या पुलामुळे पावसाळ्यात निर्माण होणारी नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
चिपळूण शहरातील पेठमाप आणि मुरादपूर ही दोन मोठी लोकवस्ती असणारे भाग वाशिष्ठी नदीमुळे विभागलेले आहेत. इंग्रजांच्या काळात येथे फरशी बांधण्यात आली होती. ओहोटीच्यावेळी या फरशीवरून वाहतूक केली जात होती. आताही काही प्रमाणात ती फरशी अस्तित्वात असून त्यावरून हलकी वाहने ये-जा करतात; परंतु भरतीच्यावेळी तसेच पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे येथील वाहतूक तसेच येण्या-जाण्याचा मार्गदेखील बंद पडतो. साहजिक पावसाळ्यात नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे येथे पूल व्हावा, अशी मागणी नागरिक कित्येक वर्ष करत होते. अखेर शासनाकडून पेठमाप-मुरादपूर असा पूल मंजूर झाला आहे. लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी या पुलाकडे विशेष लक्ष केंद्रीत केले असून, या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये पुलाचे काम पूर्ण होऊन अॅप्रोच रोडचेदेखील काम पूर्णत्वास जाऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल. अॅप्रोच रोडचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर हा पूल सुरू झाल्यास मुरादपूर, पेठमाप, दादरमोहल्ला, बेबल मोहल्ल्यासह शहरातील बहुतांशी भाग जोडला जाणार आहे. त्यातून शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध होऊन वाहतूककोंडीची समस्यादेखील सुटण्यास मदत होणार आहे.
---
पुलासाठी १२ कोटी मंजूर
पुलाच्या कामासाठी सुमारे १२ कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. सुमारे दीड वर्षांपासून या पुलाचे काम सुरू आहे. या पुलाची उंची सुमारे साडेसात मीटर, लांबी २२५ मीटर, १४ पिलर, २ अब्युटमेंट तर या पुलावर एकूण ६० गर्डर चढवण्यात आले आहेत. आता या पुलाचे काम शेवटच्या टप्प्यात असून, फेब्रुवारीअखेर पूर्ण होईल, असा विश्वास ठेकेदार कंपनीने व्यक्त केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.