वडगाव मावळ, ता. १२ : राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मावळ तालुक्यातून चार हजार ७३७ विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा एकूण २८ केंद्रांवर पार पडली.
पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मावळ तालुक्यातील १६३ प्राथमिक शाळांमधून तीन हजार १९९ विद्यार्थ्यांनी नावे नोंदवली होती. त्यातील तीन हजार ११७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ८२ विद्यार्थी गैरहजर राहिले. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मावळ तालुक्यातून ८८ शाळांमधील एक हजार ६६३ विद्यार्थ्यांनी नावे नोंदवली होती. त्यापैकी एक हजार ६२० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. ४६ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. मावळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी नियोजन केले होते. विद्यार्थ्यांना तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे व पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या. सर्व केंद्रांवर ही परीक्षा शांततेत पार पडल्याचे वाळुंज यांनी सांगितले.