Pakistan Stock Market Update: एकीकडे भारतीय शेअर बाजारात गेल्या पाच महिन्यांपासून परदेशी गुंतवणूकदार विक्री करत आहेत. मात्र दुसरीकडे काही महिन्यांपूर्वी आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येताच तेथील स्टॉक एक्स्चेंजने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.
जागतिक स्तरावर पाकिस्तानी शेअर बाजार गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा देणारा बाजार बनला आहे, त्यानंतर परदेशी गुंतवणूकदार पाकिस्तानकडे वळू लागले आहेत.
जगभरातील बाजारात घसरण होत असताना पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजचा KSE-100 निर्देशांक 1632 अंकांच्या किंवा 1.47 टक्क्यांच्या वाढीसह 1,13,000 अंकांच्या पुढे गेला आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये पाकिस्तान शेअर बाजार निर्देशांकाने 1 लाखांचा टप्पा ओलांडला होता. पाकिस्तानच्या शेअर बाजारातील या वाढीमुळे जगभरातील गुंतवणूकदार आश्चर्यचकित झाले आहेत.
BlackRock आणि Eaton Vance Corporation सारख्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या पाकिस्तानच्या शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. या बाजाराने 2024 मध्ये गुंतवणूकदारांना 84 टक्के परतावा दिला आहे.
पाकिस्तानी शेअर बाजाराचे आकर्षक मूल्यांकन आणि तेजीच्या अर्थव्यवस्थेने गुंतवणूकदारांना तेथील शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास प्रेरित केले आहे. ब्लूमबर्गच्या मते, 2025 मध्ये पाकिस्तानी शेअर बाजार गुंतवणूकदारांना 40 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो.
पाकिस्तानी कंपन्यांच्या उत्कृष्ट निकालामुळे परदेशी शेअर बाजारात आपली गुंतवणूक वाढवत असल्याचे गुंतवणूकदारांचे मत आहे. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, लीगल अँड जनरल इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट लिमिटेड आणि एव्हली फंड मॅनेजमेंट कंपनीनेही पाकिस्तानी बाजारपेठेत गुंतवणूक वाढवली आहे.
जुलै 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला संकटातून सोडवण्यासाठी 7 अब्ज डॉलर्सचे पॅकेज जाहीर केले होते. तेव्हापासून तिथली अर्थव्यवस्था वाढत आहे. महागाई देखील सातत्याने कमी होत आहे.
पण अर्थव्यवस्थेपुढील आव्हान संपले आहे असे नाही. सहा महिन्यांत करवसुलीचे उद्दिष्ट 6 टक्क्यांपेक्षा कमी आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आयएमएफला केवळ कर संकलन वाढविण्याच्या अटीवर 7 अब्ज डॉलरचे पॅकेज दिले होते.