चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच कर्णधार रोहित शर्माने दिला वर्ल्डकपचा संदर्भ, म्हणाला…
GH News February 13, 2025 12:10 AM

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीची लिटमस टेस्ट पास केली आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडला 3-0 ने पराभूत केलं आहे. या मालिकेत भारतीय संघात कोणतीच उणीव दिसून आली नाही. इतकंच काय तर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही सूर गवसला. रोहित शर्माने दुसऱ्या वनडे सामन्यात शतकी खेळी केली. तर विराट कोहलीने शेवटच्या वनडे सामन्यात अर्धशतक ठोकून चॅम्पियन ट्रॉफीपूर्वी शुभ संकेत दिले आहेत. या मालिकेत भारताने तिन्ही वेळेस नाणेफेकीचा कौल गमावला होता. तिसऱ्या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. भारताने या सामन्यात 50 षटकात सर्व गडी गमवून 356 धावा केल्या. या सामन्यात शुबमन गिलची बॅट चांगलीच तळपली. त्याने वनडे क्रिकेटमधील सातवं शतक ठोकलं. एकंदरीत त्याने या मालिकेत जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळे त्याला सामनावीर आणि मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने संघाबाबत आपली मत मांडलं. तसेच काय चूक आणि काय बरोबर याचा लेखाजोखा मांडला.

कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, ‘आम्ही ज्या पद्धतीने या मालिकेत खेळलो ते पाहून खूपच आनंदी आहे. आम्हाला येणाऱ्या आव्हानासाठी सज्ज होतो. आम्ही या मालिकेत काय चूक केली असं मला वाटत नाही. काही क्षुल्लक गोष्टी आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतोय. पण त्या गोष्टी काय आहेत ते इथे उभं राहून सांगणार नाही. संघ सातत्यपूर्ण चांगली काम करत आहे. आम्ही ते सातत्य ठेवण्याचं काम करत आहोत. आमच्यातील संवादही स्पष्ट आहे. अर्थातच कोणताही चॅम्पियन संघ प्रत्येक सामन्यात सुधारणा करू इच्छितो आणि तेथून पुढे जाण्याचा प्रयत्न असतो.’

‘आजच्या संघाच्या धावसंख्येमुळे खूप आनंदी आहे. संघात प्रत्येकला तिथे जाऊन कसं खेळायचं याचं स्वातंत्र्य आहे. वर्ल्डकप त्याचं उत्तम उदाहरण होतं. तेच आता आम्ही पुढे करत राहणार आहोत.’, असंही रोहित शर्माने पुढे सांगितलं. दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीला जसप्रीत बुमराह मुकला आहे. असं असूनही त्याची उणीव या मालिकेत भासली नाही. त्यामुळे अशाच खेळीची अपेक्षा या संघाकडून असणार आहे. भारतीय संघ 15 फेब्रुवारीला दुबईला रवाना होणार आहे. भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशशी होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.