मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही महिनाभरापासून घसरण सुरु आहे. बीएसईवर सेन्सेक्स अन् एनसईवर निफ्टी 50 मध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.मात्र, भारतीय गुंतवणूकदारांचा शेअर बाजारावरील विश्वास वाढत असल्याचं पाहायला मिळालं. एसआयपीच्या माध्यमातून शेअर बाजारात होणारी गुंतवणूक 26000 कोटींवर पोहोचली आहे. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडवरील डीमॅटच्या खात्यांची संख्या 15 कोटींवर पोहोचली आहे. हा टप्पा 12 फेब्रुवारीला पार झाला.
भारतीय गुंतवणूकदारांचा शेअर बाजारावरील विश्वास कायम असल्याचं पाहायला मिळालं आहे. एसआयपीद्वारे म्यूच्युअल फंडमध्ये 26400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात ही रक्कम 26459 कोटी रुपये होती.
लार्ज कॅप म्यूच्युअल पंडमधील गुंतवणूक जानेवारी महिन्यात डिसेंबरच्या तुलनेत 52 टक्क्यांनी वाढली आहे. जानेवारी महिन्यात लार्ज कॅपमध्ये 3036 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. डेब्ट फंडमध्ये 1.29 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.ईटीएफमध्ये 3751 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.
स्मॉल कॅप आणि मिडकॅप फंडमध्ये गुंतवणूक वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. मिडकॅपमधील गुंतवणूक 5148 कोटी रुपये तर स्मॉलकॅपमधील गुंतवणूक 5721 कोटींवर पोहोचली आहे. तर, सेक्टर/ थीमॅटिक क्षेत्रातील गुंतवणूक 9017 कोटींवर घसरली आहे.
भारतीय शेअर बाजारातील देशांतर्गत गुंतवणूकदारंची संख्या वाढत असल्याचं समोर आलं आहे. डीमॅट खातेधारकांची संख्या 15 कोटींवर गेली आहे.
विदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतले पण…
जागतिक बाजारातील वाढती अस्थिरता आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लादण्यात येत असलेले टॅरिफ यामुळं व्यापार युद्धाची शक्यता निर्माण झाल्यानं विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून भारतीय शेअर बाजारातून काढता पाय घेतला जातोय. जानेवारी महिन्यात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 78000 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी10 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढून घेतली आहे. डिसेंबर 2024 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी 15 हजार कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली होती. यामुळं भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. हे चित्र असलं तरी एसआयपीद्वारे भारतीय भांडवली बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. कारण, डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025 मध्ये 25 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम म्यूच्युअल फंडमध्ये जमा झाली आहे.
इतर बातम्या :
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
अधिक पाहा..