पिंपरी इंद्रायणी थडी पुढे ढकलली
esakal February 13, 2025 09:45 PM

परीक्षा आणि अन्य कारणांमुळे
‘इंद्रायणी थडी’ पुढे ढकलली

शिवांजली सखी मंच आणि संयोजकांची माहिती

पिंपरी, ता. १३ ः भारतीय जनता पक्षाचे नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून शिवांजली सखी मंचतर्फे २७ फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधीत भोसरीत इंद्रायणी थडी महोत्सव आयोजित केला होता. पण, काही कारणांमुळे महोत्सव पुढे ढकलण्यात आल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
आयोजकांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे की, सध्या १२ वीची परीक्षा सुरू आहे. इंद्रायणी थडीच्या नियोजित स्थळाच्या परिसरात सुमारे २५ मोठ्या शाळा आहेत. इंद्रायणी थडीमुळे परीक्षार्थींची गैरसोय होऊ शकते. वाहतूक नियोजन आणि नियंत्रणही महत्त्वाचे आहे. याबाबत शिक्षण संस्थांनीही तोडगा काढण्याची मागणी केली होती. मोशी आणि चऱ्होली गावातील ग्रामदैवतांचा उत्सव होणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना सहभागी होता येणार नाही. अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास आणि प्रखर हिंदुत्ववादी कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांचे निधन झाले आहे, आदी कारणांमुळे इंद्रायणी थडी महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे.

देव-देश अन् धर्म आणि शेती-माती-संस्कृतीचा पुरस्कार आणि स्त्रीशक्तीचा सन्मान या संकल्पनेतून होणारा इंद्रायणी थडी महोत्सव काही दिवस पुढे ढकलण्यात येत आहे. महिला बचत गट आणि विविध उपक्रम, कार्यक्रमांचे संयोजक यांनी नोंदणी केलेले स्टॉल व कार्यक्रम याचे नियोजन ‘जैसे थे’ राहील. नवीन वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर सर्वांनाच पूर्वसूचना दिली जाईल.
- मुक्ता गोसावी, समन्वयक, इंद्रायणी थडी महोत्सव

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.