राधिका वळसे पाटील
पुणे, ता. १३ : ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्ताने प्रियजनांना भेटवस्तू देण्यासाठी बाजारपेठेत विविध प्रकारच्या वस्तूंचे बहुपर्याय उपलब्ध झाले आहेत. प्रेमाचा संदेश देणारी कार्ड, विविध प्रकारचे लिफाफे, एलईडी टेडी, प्रेमकथा असलेली पुस्तके, विविध प्रकारची फुले, बुके, कपडे, ज्वेलरी, अत्तर आणि घड्याळ अशा वस्तू खरेदी करण्यासाठी तरुणाईची गर्दी होत आहे.
यंदा बाजारपेठेत ‘सॉफ्ट टॉइज’ आकारातील विविध वस्तू आकर्षण ठरत आहे. प्रेमभावना व्यक्त करणारे टेडिबेअर १०० रुपयांपासून सात हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा न करता संपूर्ण आठवडा म्हणजेच ‘व्हॅलेंटाइन वीक’ साजरा करण्याकडे सध्या युवकांचा कल आहे. या आठवड्यात लाल आणि काळ्या रंगाचे कपडे वापरण्यास प्राधान्य दिले जाते. महाविद्यालय परिसरातील हॉटेल्स, कँटीन सजली आहेत.
या वस्तूंची होतेय खरेदी
कपल शोपीस, मिनियन कार्टून, टेडी चॉकलेट, डान्सिंग टेडी, मॅग्नेटिक टेडी, क्रिस्टल किचन, लेडीज वॉलेट, शोपीस, कॉफी मग, म्युझिकल बास्केट, सॉफ्ट टॉइज, हार्टशेप पिलो, चॉकलेट बुके, परफ्युम, पर्स, कोलाज फोटो फ्रेम, घड्याळे, किचेन, पेन, गिफ्ट, टेडी, चॉकलेट, भेट कार्ड, लखोटा, ब्रेसलेट, सेंटेड मेणबत्त्या, गळ्यातील चेन आदी वस्तू विक्रीसाठी मांडण्यात आल्या आहेत. त्याच्या खरेदीस तरुणार्इची पसंती आहे.
र्इ-मार्केटवर खास सवलती
गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केलेल्या भेटवस्तू, नावापासून किंवा फोटोपासून बनवलेले किचन, हव्या असलेल्या फोटोंचे कॅलेंडर आणि डायऱ्या आदींचा त्यात समावेश आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने बाजारपेठांसह ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे विविध संकेतस्थळांवर अनेक भन्नाट वस्तू उपलब्ध असून त्यावर आकर्षक सवलतीही आहेत. त्यामुळे ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्त संपूर्ण बाजारपेठ गुलाबी झाली आहे, प्रेमाचा हा आठवडा जसा तरुणांसाठी खास असतो, तसा आम्हा व्यावसायिकांसाठी फायद्याचा आहे. छोट्या आकारापासून ते मोठ्या आकाराच्या प्रेमाचे संदेश देणाऱ्या विविध भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड्स, लेटरपॅड आदींना वाढती मागणी आहे.
- एक व्यावसायिक
प्रिय व्यक्तीला काहीतरी हटके गिफ्ट देण्याचा माझा मानस आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा बाजारात अनेक प्रकारच्या भेटवस्तू आल्या आहेत. मी लायटिंग असलेले कार्ड खरेदी केले आहे. ऑनलार्इन देखील मी काही वस्तू खरेदी केल्या आहेत.
- साहिल सुर्वे, खरेदीसाठी आलेला तरुण