राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल्यांचा धडाकाच लावल्याचे दिसून येत आहे.
राज्य सरकारकडून मागील आठवड्यात एकूण 13 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा 9 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे गुडबुकमधले अधिकारी म्हणून राजेश देशमुख यांच्याकडे पाहिले जाते. त्यांची राज्य उत्पादन शुल्क आयुक्त पदावर बदली झाली आहे. तसेच अजित पवारांच्या कार्यालयाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे असणार आहे.
दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांची बदली कोकण विभागाचे विभागीय आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नयना गुंडे नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तपदावरुन त्यांची पुणे येथे महिला व बाल आयुक्तपदावर बदली करण्यात आली आहे.
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची पुण्यात साखर आयुक्त नियुक्ती करण्यात आली आहे.
धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांची सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आयएएस अधिकारी राहुल कुमार मीना यांची लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
लीना बनसोड यांची नाशिक येथील आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मिलिंदकुमार साळवे आणि विमला आर यांची दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आणि सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.