परभणी : राज्यातील आंबेडकरी समाजबांधव, संघटना आणि विविध पक्षांद्वारे मुंबई येथील मंत्रालयासमोर तीन मार्चला राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी शुक्रवारी (ता.२१) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
डॉ. हत्तीअंबिरे म्हणाले, श्वास घेता न आल्याने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. परंतु, ‘घाटी’शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार, सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याची बाब पुढे आली.
या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, मारेकऱ्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा, आरोपींवर कठोर कारवाई करावी, सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबांना एक कोटी रुपये आर्थिक मदत द्यावी, कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे आदी मागण्या मान्य न झाल्यास तीन मार्चला मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात येईल.
गौतम मुंडे, आकाश लहाने, सुधीर कांबळे, मिलिंद घुसळे, राहुल कांबळे, अमित काळे, धम्मदीप रोडे, अक्षय जगताप, गौतम भराडे, उत्तम गायकवाड, मिलिंद खिल्लारे, बुध्दभूषण हत्तीअंबिरे, मंचक खंदारे आदी उपस्थित होते.