सुनंदन लेले : बांगलादेशला हरवून विजयी सलामी दिली असली तरी तील या सामन्यात बऱ्याच चुका झाल्या. क्षेत्ररक्षणातील चुका मुळावर येऊ शकतात, याची जाणीव भारतीय संघाला आहे. रविवारी होणाऱ्या महत्त्वाच्या लढतीची तयारी करीत असताना त्याच चुका टाळण्याकडे भारतीय संघ लक्ष देणार आहे.
एखाददुसरा झेल सुटतो. अगदी सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाकडूनही चूक होऊ शकते. जर झेल किंवा फलंदाजांना बाद करायची संधी एकाच सामन्यात तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा निसटली असेल तर मग मात्र त्याचा गांभीर्याने विचार करावा लागतो. भारतीय संघाने बांगलादेशसमोर खेळताना झेल सोडले तसेच धावबाद करायची आणि यष्टीचीतची संधीही दवडली.
सामन्यावर त्याचा मोठा परिणाम झालेला दिसला. त्यातील रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्याने सोडलेले झेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्तरावर सोपे मानले जातात. पाकिस्तान आणि न्यूझीलंडसारख्या दर्जेदार संघासमोर अशी चूक करणे चांगलेच महागात पडू शकते, हे भारतीय संघ मनोमन जाणून आहे.
पहिल्या सामन्यात सपाटून मार खाल्लेला पाकिस्तानचा संघ खास विमानाने दुबईला येऊन धडकला आहे. रविवारचा भारतीय संघासमोरचा सामना पाकिस्तानसाठी जिंकू किंवा मरू असल्याने दडपणाचे ओझे पाकिस्तानी खेळाडूंना जाणवू लागले आहे. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी संघाच्या खेळण्याच्या शैलीवर केलेल्या बोचऱ्या टीकेने मनोधैर्यालाही धक्का लागतो आहे. विशेष करून बाबर आझमने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायच्या उद्देशाने धावगती राखली नाही. तो फक्त स्वत:चे अर्धशतक कसे होईल याचा विचार करीत होता, अशी टीका माजी खेळाडूंनी केली आहे.
गुरुवारी सामना खेळून थकलेल्या भारतीय संघाने शुक्रवारी विश्रांती घेणे पसंत केले. पाकिस्तानच्या संघाने आयसीसी अकादमीच्या मैदानावर संध्याकाळी दोन तास सराव केला.
पुनरागमनात संयम महत्त्वाचा : शमी
मोठी दुखापत होते आणि त्यावर शस्त्रक्रिया करावी लागते तेव्हा परत तीच तंदुरुस्ती आणायला मोठी मेहनत करावी लागते आणि संयम ठेवावा लागतो. शस्त्रक्रिया झाल्यावर सुधारणेच्या वाटेवर वेदना सतत जाणवत असतात. परत परत त्याच गोष्ट संयम ठेवून कराव्या लागतात. मी सात-आठ तास मेहनत नॅशनल क्रिकेट अकादमीत करीत होतो. जेव्हा बरे वाटू लागले तेव्हा पुनरागमन करताना स्थानिक क्रिकेट सामने खेळल्याने मला गोलंदाजीतील आत्मविश्वास परत आणायला खूप मोठी मदत झाली, असे शमीने सांगितले.
माझी भारतीय संघात परतण्याची त्याच लयीत मारा करायची भूक जबरदस्त होती. बाकी प्रयत्न केल्यावर यश मिळणे न मिळणे आपल्या हाती नसते. दुबईच्या पहिल्या सामन्यात सीमारेषा एका बाजूला लांब होती आणि एका बाजूला थोडी जवळ होती. मला वाटते जेव्हा गोलंदाज सुंदर लयीत मारा करतो तेव्हा या गोष्टीकडे लक्ष जात नाही; पण जेव्हा लय चांगली नसते तेव्हा तीच रेषा जवळ वाटू लागते, असे शमी म्हणाला.