मराठा साम्राज्याचे वीर योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसला आहे. चित्रपटाच्या संकलनाच्या वेगाने निर्माते आणि कलाकारही अचंबित झाले आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशल यांनी संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहेत. अक्षय खन्ना यांनी औरंगजेबाची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे.
दमदार कमाईचित्रपटाने पहिल्या दिवशी ३१ कोटींची जोरदार सुरुवात केली होती आणि पहिल्या आठवड्यात २१९.२५ कोटींचा गल्ला जमवला. आता दुसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट दमदार कमाई करत आहे.
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, 'छावा'ने आठव्या दिवशी तब्बल २३ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आठ दिवसांत या चित्रपटाची एकूण कमाई २४२.२५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 'छावा'ने 'अॅनिमल', 'गदर २', 'जवान' यांना मागे टाकले. ‘छावा’ने ८ व्या दिवशी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले आहे.
'पुष्पा २' – २७ कोटी
'छावा' – २३ कोटी
'अॅनिमल' – २१.५६ कोटी
'गदर २' – २०.५ कोटी
'जवान' – २०.१ कोटी
'बाहुबली २' – १९.७५ कोटी
'दंगल' – १८.२६ कोटी
'स्त्री २' – १६.८ कोटी
यामध्ये केवळ 'पुष्पा २'च 'छावा'च्या वरती आहे, मात्र 'जवान', 'गदर २', 'अॅनिमल', 'बाहुबली २' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांनाही 'छावा'ने मागे टाकले आहे.
२५० कोटींच्या उंबरठ्यावर ‘छावा’, रविवारी ३०० कोटीचा टप्पा?‘छावा’ने आता २५० कोटींच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले आहे. शनिवारी हा चित्रपट सहज २५० कोटींचा आकडा पार करेल आणि रविवारी ३०० कोटींच्या दिशेने वेगाने वाटचाल करेल. जर चित्रपटाच्या कमाईचा वेग असाच राहिला, तर 'छावा' लवकरच ५०० कोटींचा टप्पा पार करू शकतो.
इतिहासावर आधारित मराठी कथा हिंदी सिनेमात मांडली गेली आणि देशभरात सुपरहिट ठरली, याचा सर्वांना अभिमान वाटत आहे. संभाजी महाराजांचा पराक्रम आणि बलिदान संपूर्ण देशाला माहिती व्हावे, यासाठी 'छावा' एक महत्त्वाचा चित्रपट ठरत आहे.