उरुळी कांचन - पोलिसांत तक्रार दिल्याचा राग मनात धरून नऊ जणांच्या टोळीने लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने तीन जणांना बेदम मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाली आहेत. आवेश मलीक, बाबु मलीक व अनिस मलीक (सर्व रा. पाण्याच्या टाकीसमोर समतानगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली) हे गंभीर जखमी झाले आहेत.
आकिब इकबाल अन्सारी, आदिल इकबाल अन्सारी व इतर ६ ते ७ साथीदार ( सर्व रा. इंदीरानगर कदमवाकवस्ती, हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आवेश बाल्लनखा मलीक (वय २०, रा. पाण्याच्या टाकीसमोर समता नगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती येथे शुक्रवारी (ता. २१) रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास गुलीस्ता बेकारीवर आवेश हा नेहमीप्रमाणे काम करीत होता. त्याच्या सोबत बाबु मलीक, वकील मलीक, अनिस मलीक हे देखील होते. त्यावेळी बेकरीसमोर तीन दुचाकीवरून ९ जण आले. त्यामध्ये आकीब व आदील अन्सारी हे होते.
इतरांनी तोंडावर रुमाल बांधल्याने त्यांना ओळखता आले नाही. त्यावेळी आकीब व आदील यांच्या हातात धारदार हत्यार होते, तसेच इतर दोघांच्या हातामध्ये लोखंडी रॉड व एकाच्या हातामध्ये लाकडी दांडके होते. ते सर्वजण आले व बेकरीच्या काचांची तोडफोड करु लागले. त्यांना आवेश याने विरोध केला असता आकीब याने शिवीगाळ करत "मेरे खिलाफ पोलिसमे कम्प्लेंट करता है क्या?
आज तुझे इधरही खल्लास कर डालता'', असे म्हणत त्याने त्याच्या हातातील धारदार हत्याराने आवेश याच्या डोक्यावर वार केला परंतु त्याने तो वार हुकवला. तो उजव्या कानाच्या वरच्या बाजूला लागला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
इतर साथीदारांनी बाबु मलीक व अनिस मलीक यांना रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये बाबु मलीक अनिस मलीक यांच्या डोक्यात जखमा झाल्या आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, २० फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बेकरीवर अकिब व अदिल अन्सारी आले होते. त्यावेळी त्यांनी १० रुपये किंमतीचे कॅडबरी चॉकलेट घेतले. सदर चॉकलेटचे पैसे आदील याने गुगल पे द्वारे पाठवतो असे म्हणून त्याने मी १०० रुपये गुगल पे पाठवितो त्यातले १० रुपये तुझे घेवुन उरलेले ९० रुपये मला रोख दे असे म्हणाला.
त्याला आवेश याने ९० रुपये रोख नाहीत तु फक्त १० रुपये गुगल पे कर असे सांगितले. त्याचा राग आल्याने त्याने आवेश याला हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली होती. त्याबाबत त्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता. सदर गुन्ह्यावरुन आकीब इकबाल अन्सारी व आदिल इकबाल अन्सारी यांच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. या घटनेचा राग मनात धरून आरोपींनी हल्ला केला.