आरबीआय गव्हर्नर निवृत्तीनंतर मोठी जबाबदारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव-2 म्हणून नियुक्ती करण्यात आली. डॉ. पी. के. मिश्रा हे मुख्य सचिव-1 म्हणून कार्यरत असून आता त्यांच्यासोबत शक्तिकांत दास हेदेखील सेवा बजावतील. शक्तिकांत दास यांच्या निवडीला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिल्यानंतर शनिवारी कार्मिक प्रशिक्षण विभागाने यासंबंधीचा आदेश जारी केला.
शक्तिकांत दास हे तामिळनाडू केडरचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी आहेत. त्यांनी मागील 6 वर्षे आरबीआय गव्हर्नर म्हणून काम केले आहे. डिसेंबर 2024 मध्ये ते या पदावरून निवृत्त झाले होते. आता ते पंतप्रधान मोदींचे जवळचे अधिकारी होणार असल्यामुळे ‘मुख्य सचिव-2’ म्हणून त्यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. त्यांना सरकारी धोरणे आणि निर्णयांमध्ये योगदान द्यावे लागेल. मुख्य सचिव-2 या नात्याने दास यांचे काम पंतप्रधानांच्या निर्णयांची चांगल्याप्रकारे अंमलबजावणी करणे आणि विविध सरकारी कार्यक्रमांचे मार्गदर्शन करणे हे असेल.
आरबीआयचे गव्हर्नर होण्यापूर्वी दास यांनी भारत सरकारमध्ये आर्थिक व्यवहार सचिव म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी 27 नोव्हेंबर 2017 ते 11 डिसेंबर 2018 पर्यंत हे पद भूषवले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध आर्थिक सुधारणा आणि धोरणे सुरू करण्यात आली. याशिवाय दास यांनी जी-20 मध्ये भारताचे शेर्पा म्हणूनही यशस्वी भूमिका बजावत जागतिक व्यासपीठावर भारताचे वित्तीय आणि आर्थिक दृष्टिकोन मांडले होते.