- महेश कोठारे, editor@esakal.com
माझा पहिला चित्रपट ‘धूमधडाका’ने मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा अध्याय सुरू केला. त्याच्या यशानंतर माझ्या मनात विचार आला, की आता आपण प्रेक्षकांसाठी आणखी काय करू शकतो. त्यानंतरचा प्रोजेक्ट करण्यासाठी मला तब्बल दोन वर्षे लागली आणि १९८७ साली ‘दे दणादण’ हा चित्रपट मी बनवला.
‘दे दणादण’ या नावाला शोभेल अशी कथा असायला हवी. म्हणजे सांगायचा मुद्दा असा, की या वेळी मी उलटी सुरुवात केली. आधी नाव ठरवलं आणि मग कथा. त्या वेळेस देखील अण्णासाहेब देऊळगावकर माझ्यासोबत होते. मी त्यांना सांगितलं होतं, की मला काही तरी फॅण्टसी करायची आहे. काय होईल जर लक्ष्या (लक्ष्मीकांत बेर्डे) सारख्या माणसाच्या अंगात सुपरपॉवर आली तर? मग आम्ही त्या संकल्पनेवर काम करायला सुरुवात केली आणि त्यावर खूप मेहनत घेतली.
त्या वेळेस मला ‘धूमधडाका’चे महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांचे त्रिकूट हवे होते. पण आम्ही स्क्रिप्ट लिहायला घेतल्यावर लक्षात आलं, की अशोक सराफची भूमिका नीट बसत नव्हती. त्या भूमिकेला फारसा न्याय मिळत नव्हता. मग मी एक कठोर निर्णय घेतला, अशोक सराफला चित्रपटात न घेण्याचा. त्यानंतर स्क्रिप्ट चांगल्या पद्धतीने आकार घेत गेली.
हा संपूर्ण चित्रपट कोल्हापूरच्या शालिनी स्टुडिओमध्ये शूट करण्यात आला होता. फक्त काही गाणी आम्ही पन्हाळ्याच्या परिसरात चित्रित केली. त्या स्टुडिओमध्येच आम्ही एक गाव उभारलं होतं. त्यात पोलिस क्वार्टर होतं आणि एक छानसं देऊळ बांधलं होतं. त्या देवळात ‘नवशा मारुती’ची मूर्ती होती. हे नाव अण्णासाहेबांनी ठेवलं होतं.
त्यामागची गंमत अशी, की तो नवसाला पावतो म्हणून त्याला ‘नवशा मारुती’ म्हणायचे. मी लक्ष्याला सांगितलं होतं, की आपल्याकडे अशोक सराफ नाही आणि चित्रपटात फारशी कॉमेडीही नाही. त्यामुळे आपल्याला ती तयार करावी लागेल. लक्ष्मीकांत बेर्डेने यात कमाल केली होती. लाल रंग बघण्यावरून किंवा बघितल्यावर होणारी एक विशिष्ट क्रिया त्याने लीलया साकारली.
मग आम्ही एक खलनायक उभा करायचं ठरवलं. त्याचं नाव च. क. वाटलावे असं ठेवण्यात आलं. या भूमिकेसाठी मी एक नावाजलेला कलाकार निवडला होता. पण ऐनवेळी त्याने नकार दिला. हनुमान जयंतीच्या दिवशी आमचा मुहूर्त होता आणि तो कलाकार मला हवा होता. लक्ष्या आदल्या दिवशी महालक्ष्मी एक्स्प्रेस पकडून कोल्हापूरला येणार होता.
त्याच्यासोबत तो कलाकारही येणार होता; पण ऐनवेळी लक्ष्मीकांतने मला सांगितलं, की तो कलाकार येणार नाही, कारण त्याला मोठा हिंदी चित्रपट मिळाला आहे. तेव्हा मला काय करावं कळेना. मग माझे वडील अंबर कोठारे माझ्यासमोर होते. तेही मोठे कलाकार होते आणि त्यांनी अनेक नाटकांत काम केलं होतं. मग मी ठरवलं, च. क. वाटलावे ही भूमिका त्यांनीच करायची!
आमचे वितरक सुजय सिप्पी हे विदर्भातील वितरक होते. त्यांनी सांगितलं, की जर चित्रपटात अशोक सराफ नसतील तर आम्ही तो चित्रपट घेणार नाही. पण मी कुणाचीही पर्वा न करता पुढे गेलो आणि स्वतः वितरक बनलो. ‘धूमधडाका’प्रमाणेच ‘दे दणादण’ मी आधी पुण्यात प्रदर्शित केला. त्यासोबतच चिंचवड आणि हडपसर येथेही रीलिज केला.
पहिल्याच आठवड्यात तिन्ही ठिकाणी १०० टक्के बॉक्स ऑफिस कलेक्शन झालं. मग मुंबईत प्रदर्शित केला. ''धूमधडाका''प्रमाणेच मी भारतमाता सिनेमामध्येच ‘दे दणादण’ रीलिज केला आणि प्रीमियरही तिथेच केला. विजय टॉकीजमध्ये माझा हा दुसरा सिल्व्हर ज्युबली चित्रपट ठरला.
चित्रपटाच्या अनेक खास आठवणी आहेत. उदाहरणार्थ लक्ष्याला दुसऱ्या मजल्यावरून उडी मारायची होती. त्या वेळेस तिथे कुठल्याही उंच इमारती नव्हत्या. पण एका वूडलॅण्ड हॉटेलच्या बाजूला एक तीन मजली घर होतं. तिथून उडी मारायची होती. मग त्याचा डुप्लिकेट मागवला. त्या काळी बॉक्सेस वापरायचे. पण त्याचा खर्च खूप यायचा. फायटरने सुचवलं, की फायर ब्रिगेडचं जाळं आणि २०-२५ लोकांची गरज भासेल. मग आम्ही युनिटमधल्या लोकांनाच कामाला लावलं आणि अखेर उत्तम शॉट मिळाला.
चित्रपटात मी एक पॅरोडी गाणं केलं होतं. त्या गाण्यात प्रत्येक वेळी लक्ष्याचे कपडे बदलले होते. दादा कोंडके यांच्या गाण्यात त्यांचे कपडे, जितेंद्रसाठी त्याची स्टाईल, संजीव कुमारसाठी फाटके कपडे. ते गाणं प्रचंड गाजलं. गाणी रेकॉर्ड करताना अनिल-अरुण ही संगीतकारांची जोडी फुटली होती.
त्यांच्यापैकी अरुण पौडवाल पहिल्यांदा माझ्याकडे आले आणि म्हणाले, की ''धूमधडाका''साठी आपण एकत्र काम केलं होतं, तर ‘दे दणादण’मध्येही करू. पण मी त्यांना सांगितलं, की अनिल मोहिले माझ्या वडिलांचे मित्र आहेत, त्यामुळे मी त्यांनाच प्राधान्य देईन. अरुण यांनीही माझं म्हणणं हसत स्वीकारलं आणि काही मनावर घेतलं नाही.
अनिल मोहिले यांनी ‘दे दणादण’ हे टायटल सॉंग बनवलं आणि ते सुपरहिट ठरलं. त्या गाण्यात मी स्वतः ‘तंगड्या डान्स’ नावाची नवीन स्टेप तयार केली. लोकांना वाटायचं की मला नाचता येतं, पण मी नाचायचा अभिनय करायचो! लोकांना ते आवडलं. गाण्यासाठी शांताराम नांदगावकर होतेच, पण नवीन गीतकार हवा होता.
तेव्हा प्रवीण दवणे हे ठाण्यातील प्रोफेसर आणि कवी. त्यांनी त्या वेळी कधीच चित्रपटासाठी गाणी लिहिली नव्हती. मग मी त्यांना संधी दिली आणि ‘दे दणादण’ हा त्यांचा पहिलाच चित्रपट ठरला. ही ‘दे दणादण’च्या निर्मितीमागची कथा, एक संघर्ष, एक प्रवास, आणि एका वेगळ्या सिनेमाची निर्मिती!