शेअर बाजारातील सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांपुढे फक्त तीनच पर्याय दिसतात - १) विकणे, २) काहीही न करता ‘होल्ड’ करणे आणि ३) खरेदी करणे (किंवा आधी घेतलेले शेअर, ज्यांचे भाव खाली गेले आहेत, तेच आणखी घेणे- ज्याला ‘ॲव्हरेज’ करणे असे म्हणतात.)
यापैकी सध्याच्या परिस्थितीमध्ये ‘विकणे’ हा पर्याय निवडणे काहीसे धाडसाचे आणि चुकीचे वाटते, कारण, तुमचा कागदी तोटा तुम्ही प्रत्यक्षात आणाल. गेल्या २७ सप्टेंबर २०२४ रोजीच्या ८५ हजार ९७८ या उच्चांकी पातळीवरून बीएसई-सेन्सेक्स आज १० हजार अंशांनी घसरून ७५ हजार ३११ या पातळीवर आला आहे. म्हणजेच साधारण १२ टक्के कागदोपत्री तोटा दिसतो आहे.
अनेक जण स्वतःला दोष देताना दिसतात, की मी सप्टेंबरमध्येच शेअर आणि इक्विटी म्युच्युअल फंड विकून बाहेर पडायला हवे होते. परंतु, असे स्वतःला अपराधी मानणे अयोग्य वाटते. एक ज्येष्ठ शेअर बाजारतज्ज्ञ २०२३ पासून सांगत होते, की बाजार खूप महाग आहे आणि तो घसरण्याची दाट शक्यता आहे.
परंतु, प्रत्यक्षात मात्र बाजार त्यानंतरसुद्धा तब्बल १८ महिने वर जात राहिला. अर्थात, तुम्ही-आम्हीच काय, पण नामवंत फंड व्यवस्थापकसुद्धा बाजाराचा अचूक अंदाज करू शकत नाहीत. गेल्या सप्टेंबरमध्ये बाजार सर्वोच्च पातळीवर होता हे आपल्याला आज लक्षात येते आहे. तुम्ही सप्टेंबरमध्ये विकल्यानंतर बाजार वर गेला असता तर...?
याच पर्यायाचा दुसरा भाग म्हणजे म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’ थांबविणे. ते मात्र चुकीचे ठरू शकते. याचे साधे कारण म्हणजे, बाजार घसरल्यामुळे इक्विटी म्युच्युअल फंड योजनेचे निव्वळ मालमत्ता मूल्यसुद्धा (एनएव्ही) घसरते. त्यामुळे अशा काळात तुम्हाला युनिट जास्त मिळतात. ही वेळ ‘एसआयपी’ थांबवण्याची नाही, तर वाढवण्याची आहे.
दुसरा पर्याय म्हणजे काहीही न करता शांत राहाणे. खरेदी किंवा विक्री न करणे आणि शेवटचा म्हणजे तिसरा पर्याय आहे, अजून खरेदी करणे. हा पर्याय धाडसाचा असला तरीसुद्धा योग्य वाटतो. अर्थात या परिस्थितीमध्ये बहुतेक लोकांकडे पैसे नसण्याची शक्यता अधिक आहे.
परंतु जर काही कारणाने पैसा हातात आला असेल आणि तो दीर्घकाळासाठी लागणार नसेल, तर तो पुढील चार-पाच महिन्यांमध्ये आणि दोन-तीन हप्त्यांमध्ये लार्ज कॅप शेअर किंवा लार्ज कॅप म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणे योग्य ठरेल, असे वाटते. ज्यांच्याकडे पैसे आहेत किंवा इतर मालमत्ता विभागातून काढता येणार आहेत, त्यांच्यासाठी ही फार मोठी संधी आहे.
गुंतवणूक न करून बाजार वर गेल्यामुळे पश्चात्ताप करण्यापेक्षा, गुंतवणूक करून बाजार खाली गेल्यामुळे पश्चात्ताप करणे हे नेहमीच योग्य ठरते. अर्थात, आज आपण परदेशी गुंतवणूकदारांचे आभार मानले पाहिजेत, की त्यांनी आपल्याला आपल्याच बाजारातील चांगल्या कंपन्यांचे शेअर वाजवी भावात खरेदी करण्याची संधी दिली आहे.
परदेशी गुंतवणूकदार पुढील काळात जेव्हा-केव्हा खरेदी करतील, तेव्हा हेच शेअर आपल्या आवाक्यात राहणार नाहीत. सर्वांत खालच्या पातळीला खरेदी आणि सर्वांत वरच्या पातळीला विक्री करणे हे कुणालाच शक्य होत नाही. त्यामुळे घसरण पूर्ण होण्याची वाट न पाहता ‘सेन्सेक्स’च्या ७५ हजार अंश या पातळीच्या आसपास दोन ते तीन हप्त्यांमध्ये बाजारात गुंतवणूक करणे योग्य वाटते.
...तरीही बाजार का घसरला?
ऑक्टोबर २०२४ पासून ते आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी साधारणपणे दोन लाख कोटी रुपयांचे शेअर विकले. परंतु, देशातील गुंतवणूकदारांनी साधारणपणे तेवढीच खरेदी केली आहे. असे असताना बाजार स्थिर न राहता १२ टक्के का घसरला, असा प्रश्न गुंतवणूकदारांपुढे उभा राहणे साहजिकच आहे. त्याची तीन महत्त्वाची कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतील -
१) परदेशी गुंतवणूकदारांनी बहुतेक शेअर विकले ते ‘इंडेक्स’मधील शेअर होते- सेन्सेक्स ३० आणि निफ्टी ५०. परंतु, देशातील गुंतवणूकदारांची खरेदी ‘इंडेक्स’बाहेरील शेअरमध्येसुद्धा झाली.
२) परदेशी गुंतवणूकदार जेव्हा शेअर विकतात, तेव्हा संपूर्ण विक्री एकाच वेळी करतात. परंतु, देशातील गुंतवणूकदार मात्र खरेदी एकाच दिवशी न करता ती विभागून करतात.
३) परदेशी गुंतवणूकदार त्यांच्या विक्रीला किमतीची मर्यादा (लिमिट) लावत नाहीत. जी किंमत मिळेल, त्या किमतीला विकतात. यालाच ‘सेल टील सोल्ड’ असेही म्हणतात. यामुळे बाजारात घबराट पसरून शेअरभावात मोठी घसरण होते. परंतु, देशातील गुंतवणूकदार मात्र खरेदी करताना किमतीची मर्यादा लावतात; ज्यामुळे शेअरचे भाव एकदम वाढत नाहीत.
घसरण किती काळ राहणार?
बाजारातील परिस्थिती सुधारण्यासाठी नक्की किती काळ लागेल हे सांगणे कोणालाही शक्य नाही. जोपर्यंत अमेरिकी डॉलर मजबूत आहे, तोपर्यंत परदेशी गुंतवणूकदार विक्री सुरू ठेवण्याची शक्यता आहे. देशातील गुंतवणूकदारांच्या ‘टॅक्स हार्वेस्टिंग्ज’मुळे बाजार मार्चपर्यंत तरी नरमच राहण्याची शक्यता आहे.
‘टॅक्स हार्वेस्टिंग’ म्हणजे गुंतवणूकदार त्यांचा या आर्थिक वर्षातील भांडवली लाभ कर कमी करण्याच्या उद्देशाने तोटा असलेले शेअर विकतात. यामुळे झालेला भांडवली तोटा आधीच्या भांडवली नफ्यामधून वजा होऊन भांडवली लाभ कर कमी होतो. (अल्प व दीर्घकाळाचे नियम तपासणे आवश्यक).
कोणी काळजी करू नये?
१) ज्यांनी कर्ज घेऊन शेअर विकत घेतले नाहीत किंवा ज्यांची ‘मार्जिन फंडिंग’मध्ये खरेदी नाही.
२) जे ‘डेरिव्हेटिव्हज’मध्ये व्यवहार करत नाहीत.
३) ज्यांची इक्विटी गुंतवणूक ही म्युच्युअल फंडांमध्ये आणि ‘एसआयपी’द्वारे सुरू आहे.
४) ज्यांची लार्ज कॅप शेअर किंवा लार्ज कॅप म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक असून, स्मॉल कॅपमध्ये फारशी गुंतवणूक नाही.
५) ज्यांची ‘इक्विटी’मध्ये गुंतवणूक आहे; परंतु त्यांना पुढील एक ते दीड वर्षे पैसे लागणार नाहीत.
सकारात्मक गोष्टी कोणत्या ?
भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असून, आपल्या देशामध्ये विशेष जोखीम दिसत नाही.
१) चलनवाढ खाली येत असून, ऑक्टोबर ते जानेवारीचे आकडे अनुक्रमे ६.२१, ५.४८, ५.२२, ४.३१ असे सुधारत आहेत.
२) आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव जे एप्रिल २०२४ मध्ये ९० डॉलर होते, ते आता ७२ डॉलरपर्यंत खाली आले आहेत.
३) रिझर्व्ह बँकेने मागील पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच व्याजदरामध्ये ०.२५ टक्क्याची कपात केली आहे.
४) केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तिकर लागणार नसल्याने लोकांच्या हातात पैसे राहून, उत्पादनविक्री आणि गुंतवणुकीला चालना मिळेल.
५) वस्तू आणि सेवाकरामध्ये (जीएसटी) वाढ होत असून, तो आज साधारणपणे महिना दोन लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे.
६) म्युच्युअल फंडांच्या फक्त ‘एसआयपी’द्वारे महिन्याला २६ हजार कोटी रुपये येत आहेत. म्युच्युअल फंडांकडे बरीच तरलता आहे, जी बाजारात येऊ शकते. देशातील गुंतवणूकदारांची आपल्या बाजारातील एकूण गुंतवणूक ही परदेशी गुंतवणूकदारांपेक्षा वाढली आहे.
७) या वर्षीच्या पावसाचे अनुमान चांगले आहे.
८) शेअर बाजारात आतापर्यंच्या झालेल्या घसरणीमुळे बाजारमूल्यांकन आता पूर्वीपेक्षा आकर्षक झाले असून, १० वर्षांच्या सरासरी ‘प्राइस टू अर्निंग’ (पीई) रेशोच्या पातळीवर आले आहे.
एकूण काय, तर शेअर बाजार वर-खाली होतच राहणार, त्यामुळे गुंतवणूकदारांनी ‘भय इथले... केव्हा संपणार?’ अशी काळजी न करता, शेअर (इक्विटी) आणि रोखे (बाँड) असे योग्य मालमत्ता-विभाजन केले आणि ‘एसआयपी’ सुरूच ठेवली, तर त्यांना काळजीचे कारण राहणार नाही.
(लेखक भांडवली बाजाराचे ज्येष्ठ अभ्यासक-विश्लेषक आहेत.)