नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजनगरी येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ग्रंथनगरीला साहित्यिक मराठी भाषा प्रेमी आणि दिल्लीतील स्थानिकांनी मोठा प्रतिसाद नोंदवला.
त्यामुळे प्रकाशक आणि पुस्तक विक्रेत्या स्टॉल प्रमुखांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यादरम्यान ग्रंथ प्रदर्शनाला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.
साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या स्टॉलमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या पुस्तकांची सर्वाधिक पसंती मराठी भाषाप्रेमींनी दर्शवली. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केलेल्या अनेक ग्रंथाला साहित्य रसिक मराठी भाषाप्रेमींनी पसंती दर्शवत त्याची खरेदी केली.
दोन दिवसांत सर्वाधिक खरेदी मंडळाच्या ग्रंथांची झाली यासोबतच विविध महापुरुषांचे चरित्र ग्रंथ, संशोधन आदी ग्रंथाची सुमारे ३० हजार रुपयांची विक्री झाली असल्याचे सांगण्यात आले. यासोबत मराठीतील अत्यंत नामवंत असलेल्या प्रामुख्याने मौज प्रकाशन, ग्रंथाली, लोकवाङ्मय गृह, पॉप्युलर प्रकाशन, मेहता पब्लिशिंग हाऊस यांच्यासह दत्त देवस्थान अहिल्यानगर, इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट, संस्कृती प्रकाशन, चपराक प्रकाशन, भीष्म प्रकाशन, अष्टगंध आदी प्रकाशन, प्राजक्त प्रकाशन, मराठी साहित्य परिषद तेलंगण राज्य, मराठवाडा साहित्य परिषद, इतिहासाचार्य वि.का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे, राष्ट्रीय पुस्तक न्यास, सदा मंगल आदी प्रकाशकांच्या स्टॉलवर आज मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.
त्यांच्याकडे विविध विषयांच्या पुस्तकांची चांगली खरेदी झाले असल्याचे सांगण्यात आले. महानुभाव साहित्य प्रकाशनच्या स्टॉलवर देखील अनेक पुस्तकांची खरेदी झाली. तर रविवारी संमेलनाच्या अखेरच्या दिवशी खूप मोठा प्रतिसाद मिळेल अशा अपेक्षाही प्रकाशक आणि पुस्तक विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात आल्या.