जळगाव: राज्यातील पात्र महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत दरमहा पंधराशे रुपयांप्रमाणे लाभ मिळत आहे. या योजनेंतर्गत आर्थिक उत्पन्न प्राप्तिकर तसेच बँक खात्याशी ई-केवायसी जोडणीनुसार पडताळणी होऊन अपात्र लाभार्थी वगळण्याची प्रक्रिया सुरुवातीपासूनच केली जात आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील ४२ महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ नको म्हणून विभागाकडे अर्ज केले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील ११ हजार १७५ महिला भगिनींचे अर्ज अपात्र करण्यात आले आहेत.
राज्य सरकारने महिला सक्षमीकरणांतर्गत १८ ते ६५ वर्षे वयोगटातील अविवाहित, विवाहित, परितक्त्या, विधवा, निराधार महिलांना आर्थिक सहाय्य स्वावलंबनासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'' योजनेंतर्गत दरमहा पंधरशे रूपये लाभ देण्याच्या योजनेला जून २०२४ मध्ये मान्यता देण्यात आली.
या योजनेंतर्गत नारीशक्ती ॲप ५ लाख ३४ हजार ७०५, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ पोर्टलद्वारे ५ लाख १० हजार १२१ असे १० लाख ४४ हजार ८२६ महिलांनी अर्ज केले होते. यात शासन स्तरावर पडताळणीअंती नारीशक्ती ॲपमधील २ हजार ५५२ तर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'' पोर्टल ॲपमधील ८ हजार ६२३ असे ११ हजार १७५ महिला भगिनींचे अर्ज अपात्र करण्यात आले आहेत.
पात्रता निकष
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण'' योजना लाभासाठी वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजाराहून अधिक आहे, ज्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे, सरकारी नोकरी असणाऱ्या, दिव्यांग योजनेचा लाभ घेणाऱ्या तसेच शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा १५० किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असतील.
याशिवाय दरवर्षी आधार प्रमाणीकरण, ई केवायसी, उत्पन्न प्राप्तिकर पडताळणी वेळोवेळी करण्यात येऊन अपात्र महिला लाभार्थी यातून वगळण्यात येऊन या नियम व अटी लागू असल्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ ४२ महिलांनी स्वत:हून नाकारला अहे. तसे अर्ज या महिलांनी महिला बालकल्याण विभागाकडे सादर केले आहेत.
- आर. आर. तडवी, महिला बालकल्याण अधिकारी, जळगाव