अकोल्यातील संत्री उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. रोगराई वाढत असल्याने संत्र उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. अकोट तालुक्यात संत्र पिकांवर देठसुकी नावाच्या रोगामुळे संत्र्यांना मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दिवसरात्र मेहनत करून पिकवलेल्या संत्र उत्पादकावर रोग लागल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा खर्च निघणे कठीण झाले आहे. काही शेतकऱ्यांचं एकरी ६५ टक्के पीक धोक्यात आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
'देठसुकी' रोग म्हणजे नेमकं काय?'देठसुकी' म्हणजेच संत्र्याच्या झाडांमध्ये फळे लागल्यानंतर त्या फळांचा देठ किंवा तंतू आच्छादित होणे, ज्यामुळे फळांची गळती वाढते आणि उत्पादन घटते. या समस्येमुळे संत्र्यांच्या गळतीत प्रचंड वाढ झालेली आहे, ज्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होतो.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोट तालुक्यातील बराचसा भाग हा फळपीक आणि चांगल्या उत्पादन क्षम मालासाठी प्रसिद्ध आहे. मात्र येथील उत्पादक शेतकरी कधी अवकाळी पाऊस, गारपीठ, व्यापाऱ्यांच्या पिळवणूका तर, कधी पीकांवर रोग याला बळी पडत आहे.
मागील हंगामात हेक्टरमागे १५ लाखाचं उत्पादन झालं होतं. मात्र यंदा देठसुकी नावाच्या रोगामुळे हेक्टरी ६१ हजार रूपयांचं संत्र्याचं उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आलं आहे. शेतातील प्रत्येक झाडातून ६५ टक्के उत्पन्न वाया जात आहे. अकोट तालुक्यातील ऐदलापूर शेतशिवारातील संत्रा गळतीचे भयावह दृश्य सध्या पाहायला मिळत आहे.. केवळ ३५ टक्के उत्पन्न हाती येत असून त्याला भावही अपेक्षाप्रमाणे नसल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
अकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्र पीकाची लागवड केली जाते. परंतु मृग संत्र्याचं बहार यंदा धोक्यात असल्याचं सांगितलं जातंय. कृषी अधिकारी भेट देण्यासाठी येतात, मात्र ज्या शेतात गाडी जाते तिथेच ते भेट देतात. ज्या शेतात गाडी जाण्यासाठी रस्ता नाही या कारणास्थ ते बाहेरूनच परत जातात. संत्रा पीकांवर फवारणी करूनही पीक वाचत नाही. शेतकऱ्याच्या हातात केवळ ३५ टक्के उत्पन्न येत आहे. त्यामुळे हेक्टर प्रमाणे १ लाख रूपये मदतीची मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे.
Edited By - Purva Palande