टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा 6 विकेट्सने धुव्वा उडवलाय. पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 242 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतीय संघाने हे आव्हान 4 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. टीम इंडियाने 42.3 ओव्हरमध्ये 244 धावा केल्या. विराट कोहली हा टीम इंडियाच्या विजयाच्या हिरो ठरला. विराटने टीम इंडियाला विजयासाठी 2 धावांची गरज असताना चौकार ठोकलं. विराटने या चौकारासह एकदिवसीय कारकीर्दीतील 51 वं एकदिवसीय शतक पूर्ण करत टीम इंडियाला विजयी केलं. तसेच श्रेयस अय्यर, कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार शुबमन गिल, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनीही विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. तर पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव ठरला. पाकिस्तानचं या पराभवासह स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात आलं आहे. टीम इंडियाने यासह 2017 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमधील पराभवाचा वचपा घेत हिशोब क्लिअर केला.
रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने 31 धावा जोडल्या. कर्णधार रोहित 20 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर शुबमन आणि विराट या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 69 रन्सची पार्टनरशीप केली. शुबमनचं अर्धशतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. शुबमन 52 बॉलमध्ये 7 फोरसह46 रन्स केल्या. शुबमन आऊट झाल्याने टीम इंडिया स्कोअर 2 आऊट 100 असा झाला.
त्यानंतर विराट आणि श्रेयस अय्यर या जोडीने निर्णायक आणि शतकी भागीदारी करत टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग सोपा केला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली. श्रेयसने विराटला या दरम्यान चांगली साथ दिली. खुशदिल शाह याने ही सेट जोडी फोडली. खुशदिल याने श्रेयसला इमाम उल हक याच्या हाती कॅच आऊट केलं. इमामने अप्रतिम कॅच घेतला. श्रेयसने 67 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 56 धावांची खेळी केली. श्रेयसनंतर अवघ्या काही धावानंतर हार्दिक पंड्या झाला. हार्दिकने 8 धावा केल्या.
हार्दिक आऊट झाल्यानंतर अक्षर पटेल मैदानात आला. तोवर विराट शतकाच्या उंबरठ्यावर होता. विराटला शतकापासून रोखण्यासाठी पाकिस्तानने वाईड टाकले. मात्र विराटने पाकिस्तानच्या खेळाडूंचे ना’पाक’ मनसुबे उधळवून लावले. टीम इंडियाला विजयासाठी 2 तर विराटला शतकासाठी 4 धावा हव्या होत्या. तेव्हा विराटने 43 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर चौकार ठोकलं. विराटने यासह शतक पूर्ण करत टीम इंडियाला जिंकून दिलं.
टीम इंडियाने या विजयासह दुबईतील विजयी घोडदौड कायम राखली आहे. टीम इंडियाचा हा दुबईतील 8 पैकी सातवा एकदिवसीय विजय ठरलाय. तर एक मॅच टाय राहिली होती.
पाकिस्तानकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. मात्र त्यापैकी फक्त तिघांनाच विकेट घेण्यात यश आलं. मात्र त्याचा सामन्याचा निकालावर फरक पडला नाही. पाकिस्तानसाठी शाहीन आफ्रिदी याने 2 विकेट मिळवल्या. तर अब्रार अहमद आणि खुशदिल शाह या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
भारताचा सलग दुसरा विजय
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), इमाम उल हक, बाबर आझम, सौद शकील, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि अबरार अहमद.