आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत टीम इंडियाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. भारताने 20 नोव्हेंबरला बांगलादेशचा धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. त्यानंतर 3 दिवसांनी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. टीम इंडियाने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये विजयासाठी मिळालेलं 242 धावांचं आव्हान हे 4 विकेट्सच्या मोबदल्यात सहजासहजी पूर्ण केलं. विराट कोहली हा टीम इंडियाच्या विजयाचा खरा सूत्रधार ठरला. मात्र कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्यांनाच विजयाचं श्रेय दिलं.
विराट कोहली याने तिसऱ्या स्थानी येत बॅटिंग केली. विराटने चौकार ठोकत टीम इंडियाला विजयी करण्यासह वैयक्तिक शतकही पूर्ण केलं. विराटने एकदिवसीय कारकीर्दीतील हे 51 वं शतक ठरलं. विराटने 7 चौकारांसह नाबाद 100 धावा केल्या. टीम इंडियाच्या या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने काय म्हटलं? जाणून घेऊयात.
कर्णधार रोहितने विजयानंतर गोलंदाजांचं भरभरुन कौतुक केलं. “आम्ही अप्रतिम सुरुवात केली. पाकिस्तानला त्या धावसंख्येवर रोखणं हे गोलंदाजांच यश आहे. याचं श्रेय हे मधल्या फळीतील अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजासारख्यांना जातं. मोहम्मद रिझवान आणि सौद शकील या दोघांनी चांगली भागीदारी केली. सामना हातून गमावू नये, हे आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. हार्दिक, हर्षित आणि मोहम्मद शमी यांनी केलेली बॉलिंगही विसरुन चालणार नाही”, असं म्हणत रोहितने विजयाचं श्रेय हे गोलंदाजांना दिलं.
“त्याला देशासाठी खेळणं फार आवडतं. तो टीमसाठी खेळू इच्छितो. त्याला तेच करायचं जे तो चांगलं करतो, म्हणजे त्याने मैदानात जाऊन तेच करणं जे त्याने आज केलंय. आम्ही त्याला गेल्या काही वर्षांत तसं करताना पाहिलंय. ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्यांसाठी त्याच्या कामगिरीने आश्चर्यचकित नाहीत”, असं रोहितने स्पष्ट केलं.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), इमाम उल हक, बाबर आझम, सौद शकील, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि अबरार अहमद.