ढिंग टांग
आमचे परममित्र आणि महाराष्ट्राचे लाडके भाऊ कर्मवीर भाईसाहेब शिंदे यांना मध्यंतरी महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला. या पुरस्काराबद्दल त्यांचे आम्ही खास अभिनंदन करतो! हा पुरस्कार आजवर ना कुणाला मिळाला, ना यापुढे मिळेल!! तथापि, एवढा मोठा पुरस्कार मिळाल्यानंतरही त्यांचे अभिनंदन अन्य राजकीय नेत्यांनी केले नाही, याचे आम्हाला भारी वैषम्य वाटले. साहित्य संमेलनातही विशेष ठराव आणावा म्हणून आम्ही धडपडलो. पण सर्वत्र नन्नाचा पाढा!! म्हणून आम्ही मुद्दामच फोन करुन अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया मागवल्या काही नेते फोनवर उपलब्ध झाले, तर काहींनी फोन उचलून राँग नंबर असे म्हणून ठेवून दिला. काहींनी लेखी प्रतिक्रिया हस्तेपरहस्ते पाठवली. यापैकी काही निवडक प्रतिक्रिया देत आहो :
नानासाहेब फडणवीस : मी सर्वात आधी त्यांचे अभिनंदन केले आहे आणि करतो. त्यांना हा पुरस्कार मिळाला, यात माझाही हात आहे हे लक्षात घ्यावे. अडीच- तीन वर्षापूर्वी आम्ही सुरत, गुवाहाटी, गोव्याचे दौरे केले नसते, तर हा पुरस्कार त्यांना मिळाला असता का? त्यामुळे हा राष्ट्रगौरव एका अर्थी माझाही झाला असे मी समजतो. मीच माझे अभिनंदन कसे करणार? म्हणून आजवर मी त्यांचे जाहीर अभिनंदन केले नाही.
दादासाहेब बारामतीकर : हे बघा, कुणी कुणाला कसला पुरस्कार द्यायचा, आणि कुणी तो स्वीकारायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लोकशाहीने हा अधिकार प्रत्येकाला दिला आहे. रोज कुणीतरी कुणाला तरी पुरस्कार देत असते. रोजच्या रोज अभिनंदन करत बसण्यापलिकडे आम्हाला उद्योग नाहीत का? मी बजेटच्या कामात बिझी असल्याने अभिनंदनाचे राहून गेले. आता तुम्ही म्हणताय तर करतो!
उधोजीसाहेब : द्या, द्या, अजून पुरस्कार द्या! किंबहुना मी तर म्हणतो द्याच! त्यांना गुवाहाटीगौरव पुरस्कार द्या, सुरतरत्न किंवा गोवागौरव पुरस्कारही द्या!! मी त्यांना आधीच गद्दारगौरव पुरस्कार देऊन टाकला आहे. थैली जमवणार होतो, पण खोके जमवा, असा त्यांचा आग्रह पडल्यामुळे अजून हा पुरस्कार देता आलेला नाही. डोंबलाचा पुरस्कार! ह्या:!!
राजसाहेब : कुठला पुरस्कार म्हणालात?...खीक..! मला आधी वाटायचं की ठाण्याची मामलेदार मिसळ खाल्ल्यानंतरच कैलास जीवनची गरज पडते. पण तसं नाही, राजकारणातही काही लोक हे मलम घेऊन हिंडतात! चालू द्या, मला काय त्याचं?
नानाभाऊ पटोलेजी : कुणाला का पुरस्कार मिळेना. मी आता अध्यक्ष नाही, हे तुम्हाला कळलेलं दिसत नाही. हर्षवर्धन सपकाळजी म्हणून आहेत. त्यांच्याकडे जा! त्यांना सध्या आमच्या हायकमांडनं प्रदेशाध्यक्षपदाचा पुरस्कार दिला आहे. तरीही हे कमळवाल्यांचं षडयंत्र आहे, हे लपून राहिलेलं नाही!
हर्षवर्धन सपकाळजी : ही आनंददायक बातमी आहे. आदरणीय सोनियाजी आणि माननीय राहुलजी यांच्या पाठबळाशिवाय हे शक्य झाले नसते. काय? काय म्हणालात?...हां हां, अतिशय निंदनीय प्रकार आहे हा! आम्ही याचा निषेध करतो!! कोण? मी? हां, हां…मी आता काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे!!
जयंतरावजी पाटीलसाहेब : मी प्रतिक्रिया द्यायला उपलब्ध नाही!
आणि
खुद्द कर्मवीर भाईसाहेब शिंदे : मला पुरस्कार मिळाला, आणि अचानक अनेकांचा जळफळाट झाला. अरे कितना जलोगे? कितना जलोगे? जलकर एक दिन राख हो जाओगे!! केवळ महाशक्ती पाठीशी असल्यामुळेच हा गौरव माझ्या वाट्याला आला. मी महाशक्तीचा आभारी आहे. आमच्या महायुतीत कोणीही प्रतिक्रिया दिली नसली तरी हरकत नाही. आमच्यात कोल्ड वॉर, हॉटवॉर असं काहीही नाही. कळलं?
जय महाराष्ट्र