अमोल सुरेश गायकवाड (वय ३४, रा. वाठोडा, ता. धामणगावरेल्वे) व शिल्पा अमोल गायकवाड (वय ३०), असे मृत नवदाम्पत्याचे नाव असल्याची माहिती नांदगावपेठचे पोलिस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांनी दिली. अमोल गायकवाड व त्याचे आईवडील अनेक वर्षांपासून रहाटगाव येथील प्रज्ज्वल विठ्ठल मात्रे यांच्या फार्महाउसवर राहून रखवालदारीचे काम करतात.
घटनेच्या वेळी आईवडील खालच्या खोलीत तर मुलगा अमोल व सून शिल्पा वरच्या खोलीत होते. मुलगा व सून नऊ वाजेपर्यंत खोलीबाहेर पडले नाहीत. त्यामुळे खाली राहत असलेल्या आईवडिलांनी वरच्या खोलीत जाऊन बघितले असता मुलगा फासावर लटकलेला तर सून ही खोलीतील बेडवर मृतावस्थेत पडलेली आढळून आली.
दोघांचेही मृतदेह बघून आईवडिलांना धक्काच बसला. त्यांनी जवळच्या नातेवाइकांना माहिती दिली. नांदगावपेठ पोलिसांनी नवदाम्पत्याचे मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात पाठविले. ज्या खोलीत मृतदेह आढळून आले तेथे एक चिठ्ठी होती. त्यात स्वत:च्या मर्जीने आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले होते.
ही चिठ्ठी नांदगावपेठ पोलिसांनी जप्त केली. जिल्हा सामान्य रुग्णालयात देखील दोघांच्याही नातेवाइकांनी गर्दी केली होती. उत्तरीय तपासणीनंतर नवदाम्पत्याचे मृतदेह दुपारी नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले.
सात महिन्यांपूर्वी झाला होता विवाहया दोघांनी सात महिन्यांपूर्वीच आंतरजातीय विवाह केला होता, अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांनी घटनेनंतर नांदगावपेठ पोलिसांना दिली.
पोलिसांना याप्रकरणात शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. पत्नीचा मृत्यू कशामुळे झाला. ही बाब त्यातून स्पष्ट होईल.
-महेंद्र अंभोरे, पोलिस निरीक्षक, नांदगावपेठ ठाणे.