पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. रविंद्र धंगेकर काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत. तर आता दुसरीकडे पुणे शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी राजीनामे देणार असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता पुण्यातील काँग्रेसचे भविष्य अंधारात असल्याचे चित्र समोर आले आहे.
पुणे शहरातील काँग्रेस पदाधिकारी लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे आठ ते दहा पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे आता पुण्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडणार आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांच्यासोबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक बैठक केली आहे. येत्या आठ ते दहा दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होणार आहे. याची तारीख लवकरच निश्चित करण्यात येणार आहे. पुणे शहर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीमुळे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याचे ठरवलं आहे.
पुणे शहर समन्वय नसल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच पक्षाकडून होत असलेल्या बैठकीत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आणि दाद मिळत नाही, असं पदाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे. यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं आहे. या सगळ्या घटनेनंतर आता पुण्यात काँग्रेस हद्दपार होण्याच्या वेशीवर असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान रविंद्र धंगेकर काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा होत आहेत. ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. याआधी रविंद्र धंगेकर आणि उदय सामंत यांची भेट झाली आहे. धंगेकरांना शिंदेसेनेतून ऑफर आल्याचे सांगितले आहे. यानंतर आता ते शिवसेना प्रवेशासाठी कोणता मुहूर्त साधतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे रविंद्र धंगेकरांनी काँग्रेसला रामराम ठोकला, तर हा काँग्रेससाठी मोठा धक्का असणार आहे.