आयपीएलच्या बहुप्रतिक्षित अठराव्या मोसमाला (IPL 2025) आता काही दिवस शिल्लक आहेत . या 18 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर 25 मे रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण 65 दिवसांमध्ये 10 संघात 13 विविध ठिकाणी 74 सामने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात बंगळुरु विरुद्ध कोलकाता आमनेसामने असणार आहेत. 2008 नंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मोसमातील पहिल्या सामन्यात भिडणार आहेत. तर त्यानंतर दुसर्या दिवशी मोठा सामना खेळवण्यात येणार आहे. आयपीएलमधील 2 यशस्वी संघ आमनेसामने भिडणार आहेत. मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात 23 फेब्रुवारीला महामुकाबला होणार आहे. रोहित शर्मा विरुद्ध महेंद्रसिंह धोनी असा हा थेट सामना असणार आहे. मात्र त्याआधी धोनीच्या चेन्नई टीमच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.
मुंबई आणि चेन्नई हे या स्पर्धेतील यशस्वी संघ आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 5-5 वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. त्यानुसार यंदा ट्रॉफी जिंकण्यासाठी चेन्नईने कंबर कसली आहे. चेन्नईच्या गोटात या हंगामाआधी एका दिग्गजाची एन्ट्री झाली आहे. ती व्यक्ती कोण आहे? त्याच्यावर काय जबाबदारी असणार आहे? हे सविस्तर जाणून घेऊयात.
चेन्नईने आयपीएल 2025 साठी श्रीधरन श्रीराम यांची सहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चेन्नईने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे. श्रीधरन श्रीराम टीम इंडियाचा माजी खेळाडू राहिला आहे, मात्र त्याला फार सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. श्रीधरन याने 2000 ते 2004 या दरम्यान एकूण 8 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. तसेच श्रीधरन याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली.
श्रीधरन श्रीरामची चेन्नईत एन्ट्री
आयपीएल 2025 साठी चेन्नई सुपर किंग्स टीम : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), मथीशा पथिराना, डेव्हॉ कॉनव्हे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी, राहुल त्रिपाठी, रचिन रवींद्र, रवीचंद्रन अश्विन, खलील अहमद, नूर अहमद, विजय शंकर, सॅम करन, शेख रशीद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुडा, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, गुरजापनीत सिंह, वंश बेदी, नाथन एलिस, आंद्रे सिद्धार्थ, जेमी ओवरटन आणि श्रेयस गोपाल.