यवतमाळ : वॉरंटमधील आरोपी असलेल्या ‘बबलू’ला पोलीस वाहनात घेऊन जात असताना त्याने हातकडीसह वाहनातून पलायन केले. ही घटना लोहारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली. आरोपीने हातकडीसह पसार होताच पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी शहरालगतचे जंगल पिंजून काढले, मात्र आरोपी हाती लागला नाही.
बबलू तायडे (वय 25) रा. लोहारा असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ वर्षापूर्वी लोहारा परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणात बबलू हा आरोपी होता. त्यावेळी त्याच्यावर (लोहारा पोलीस ठाणे अस्तित्वात नसल्याने) शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार होता. दरम्यान लोहारा ठाणे स्थापन झाल्याने या हद्दीतील गुन्हे लोहारा ठाण्यात वर्ग करण्यात आले.
शनिवारी (ता.22) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरुन त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी बबलू तायडेला लोहारा पोलिसांच्या स्वाधीन केले. वैद्यकीय तपासणी तसेच अटकेची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली.
लोहारा येथे लॉकअप नसल्याने त्याला ग्रामीण पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये घेऊन जाणार होते. यासाठी त्याला हातकडी लावण्यात आली. रात्री साडेअकरा वाजता ठाण्याच्या बाहेर पोलीस त्याला गाडीत बसविण्यासाठी घेवून जात होते. दरम्यान, बबलूला संधी मिळताच त्याने पोलीसांच्या तावडीतून हातकडीसह पोबारा केला.
आरोपी पळाल्याने पोलिसांची एकच भंबेरी उडाली. याच वेळी दुसरा आरोपीही असल्याने काहींनी त्याला पकडून ठेवले. तर इतर कर्मचार्यांनी बबलूचा पाठलाग केला. पळण्यात चपळ असल्याने आरोपी बबलू तायडे पोलिसांच्या हाती लागला नाही. आरोपी हातकडीसह पोलिसांच्या तावडीतून पळाल्याची चर्चा शहरभर पसरली आहे. पोलिसांनीही आरोपीची शोधमोहीम सुरु केली आहे.
निलंबनाची टांगती तलवार?पोलिसांच्या तावडीतून आरोपी पसार झाल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे आहे. रात्रभर शोधमोहीम राबवूनही आरोपी सापडला नसल्याने आता पोलिसांवर निलबंनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.