आज येईल की उद्या येईल… या आशेवर जगभरातील लोक सुनीता विल्यम्सच्या येण्याची अंतराळाकडे डोळे लावून बसले होते. आता सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत येण्याची खबर आली आहे. ही खबर पक्की आहे. होळीनंतरच सुनीता या पृथ्वीवर मोकळा श्वास घेणार आहेत. अंतराळात यानात तांत्रिक बिघाड झाल्याने आठ दिवसासाठी अंतराळात गेलेल्या सुनीता यांना तिथेच अडकून पडावं लागलं होतं. आता सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बूच विल्मोर हे पृथ्वीवर येणार आहेत. दोघेही पुढच्याच महिन्यात पृथ्वीवर दिसतील. त्यासाठी नासाचे क्रू-10 मिशन 12 मार्च रोजी पृथ्वीवरून लॉन्च होणार आहे. त्यामुळे 19 मार्च रोजी हे दोन्ही अंतराळ वीर पृथ्वीवर येणार आहेत.
क्रू-10 मिशन नासाचे अंतराळवीर अॅन मॅकक्लेन आणि निकोल एयर्स, जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीचे अंतराळवीर ताकुया ओनिशी आणि रॉसकॉसमोसचे कॉस्मोनॉट किरिल पेस्कोव यांना ISS वर सहा महिन्यांच्या मिशनसाठी घेऊन जाईल. क्रू-10 अंतराळात पोहोचल्यानंतर, स्पेस स्टेशनवर हँडओव्हरची प्रक्रिया सुरू होईल. सध्या स्पेस स्टेशनचे कमांडर सुनीता विलियम्स आहेत. त्या या दरम्यान आपले कमांड सोपवतील. परत येणारे अंतराळवीर ड्रॅगन स्पेसक्राफ्टमध्ये चढतील. त्यानंतर 19 मार्चला ते स्पेस स्टेशनपासून वेगळे होईल. आम्ही अंतराळात अडकलोय असं आम्हाला वाटत नाही. किंवा आम्हाला अंतराळात सोडून दिले आहे, असंही आम्हाला वाटत नाही, असं सुनीता विल्यम्सने म्हटलंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि स्पेसएक्सचे सीईओंनी दोन्ही अंतराळवीरांना सोडून देण्यात आल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर सुनीता यांची ही प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे.
अंतराळवीर बुच विल्मोर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशी विधाने होत असतात. पहिल्या दिवसापासूनच आम्ही अंतराळात अडकलोय, आम्हाला अंतराळात सोडून दिलंय अशा कहाण्या सांगितल्या गेल्या आहेत. अशा पद्धतीच्या टीका होत आल्या आहेत. मी या गोष्टी समजतो. आम्ही दोघंही या गोष्टी समजतो. पण तसं नाहीये, असं विल्मोर म्हणाले. सुनीता यांनीही विल्मोरच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे. आमचा दीर्घ काळ स्पेसमध्ये राहण्याचा अनुभव नेहमीच एक शक्यता होती. आम्हाला माहीत होतं की स्टारलाइनरमध्ये काही समस्या येऊ शकतात. तसेच झाले. त्यामुळे आश्चर्याची गोष्ट नाही. आम्ही यासाठी आधीच तयार होतो, असं सुनीता यांनी स्पष्ट केलं.
दोन्ही अंतराळवीर बोइंग स्टारलाइनर अंतराळ यानाद्वारे स्पेसमध्ये गेले होते. हिलियम लीकमुळे दोन्ही अंतराळवीरांच्या परत येण्यात विलंब झाला. बोइंग स्टारलाइनरला अंतराळातून रिकामेच पृथ्वीवर परत जावे लागले. त्यामुळे विस्तारीत मिशनमुळे सुनीता विलियम्स या ISS च्या कमांडर बनल्या. अलीकडेच त्यांनी महिलांच्या वतीने सर्वात जास्त वेळेस स्पेसवॉक करण्याचा रेकॉर्ड तोडला आहे. त्यांच्या नावावर 62 तास आणि 6 मिनिटांचा स्पेसवॉक रेकॉर्ड आहे.